Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

India Vs Pakistan Cricket Match: यंदा पाकिस्तानात झालेल्या चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. भारतीय संघ पाकिस्तानात येईल आणि आपण बक्कळ पैसे छापू अशा आशेवर पाकिस्तानने अवघी स्टेडिअम नव्याने बांधून काढली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 15:57 IST

Open in App

गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यासाठी जात नाहीय. तसेच मोठ्या स्पर्धा सोडता भारत-पाकिस्तान दरम्यान स्पर्धा झालेल्या नाहीत. गेल्या महिन्यातील ऑपरेशन सिंदूरनंतर तर दोन्ही संघ एकमेकांसोबत मोठ्या स्पर्धांमध्ये तरी खेळतील की नाही, यावर शंका आहे. अशातच येत्या सप्टेंबरमध्ये आशिया कप भारतात होऊ घातला आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानी संघ भारतात येणार की नाही याबाबत चर्चा रंगल्या आहेत. 

क्रिकबझनुसार आशिया कप येत्या १० सप्टेंबरपासून भारतात खेळविला जाण्याची शक्यता आहे. यंदा पाकिस्तानात झालेल्या चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. भारतीय संघ पाकिस्तानात येईल आणि आपण बक्कळ पैसे छापू अशा आशेवर पाकिस्तानने अवघी स्टेडिअम नव्याने बांधून काढली होती. परंतू, पाकिस्तानी जनता एवढी कंगाल झालेली आहे की पाकिस्तानच्या सामन्यांनासुद्धा ती स्टेडिअममध्ये फिरकली नाही. अगदी तिथे खेळविला गेलेला या स्पर्धेचा अखेरचा सामना देखील पाकिस्तानी बोर्डाला जे तिकिटे घेतील त्यांच्यासाठी मेजवानी देण्याच्या आमिषावर खेळवावा लागला होता. त्यालाही पूर्ण स्टेडिअम भरलेले दिसेल एवढी माणसे नव्हती. 

भारताने नकार दिल्याने भारतीय संघाच्या सर्व मॅच या युएईमध्ये खेळविल्या गेल्या होत्या. आता पाकिस्तानही तेच करण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी बोर्ड भारतात खेळण्यास नकार देऊ शकते. तसेच आपलेही सामने श्रीलंका, बांगलादेश आदी देशांत किंवा युएईमध्ये खेळविण्यास सांगू शकते. आशिया कप टी२० फॉर्मॅटमध्ये खेळविला जाणार आहे. यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगानिस्तान आणि युएई हे संघ खेळणार आहेत. 

तसेही पाकिस्तानला ही स्पर्धा फारशी जिंकता आलेली नाही. आशिया कपला १९८४ मध्ये सुरुवात झाली आहे. आतापर्यंत १६ स्पर्धा खेळविण्यात आल्या आहेत. यामध्ये ८ वेळा भारत जिंकला आहे. तर श्रीलंकेने ६ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. पाकिस्तानला अवघ्या २ वेळाच ही स्पर्धा जिंकता आली आहे. २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील स्पर्धा बंद झाल्या आहेत. दोन्ही संघ केवळ आयसीसी आणि एसीसीच्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरोधात खेळतात. यामुळे पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाची हालत खराब झालेली आहे. कारण भारत हाच पाकिस्तानसाठी पैसा देणारा संघ होता. 

टॅग्स :पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघएशिया कप 2023