India vs Pakistan Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला गट फेरीपाठोपाठ सुपर-४ फेरीतही पराभवाची धूळ चारली. रविवारी रंगलेल्या सुपर-४ च्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ६ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने फरहानच्या ५८ धावांच्या जोरावर १७१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना, अभिषेक शर्माच्या ७४ धावांच्या दमदार खेळीच्या बळावर भारतीय संघाने ७ चेंडू राखून विजय मिळवला. या सामन्यामुळे पाकिस्तानचा पराभव झाला असला तरीही अद्याप पाकिस्तान स्पर्धेबाहेर झालेला नाही. त्यामुळे या स्पर्धेत आणखी एकदा भारत विरूद्ध पाकिस्तान सामना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जाणून घ्या त्यामागचे समीकरण.
पुन्हा IND vs PAK?
भारत आणि पाकिस्तानचे आता सुपर ४ मध्ये प्रत्येकी दोन सामने शिल्लक आहेत. भारतीय संघ विजयी घोडदौड करत आहे. जर भारताने उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवला तर भारत अंतिम फेरीत पोहोचेल. त्याचसोबत, पाकिस्तानला आता त्यांचे पुढील दोन्ही सामने जिंकावे लागतील. त्यांना २३ सप्टेंबरला श्रीलंका आणि २५ सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध विजय मिळवावा लागेल. जर पाकिस्तानने हे दोन्ही सामने जिंकले आणि भारताने स्वत:चे उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर २८ सप्टेंबरला पुन्हा एकदा भारत विरूद्ध पाकिस्तान सामना रंगेल. तो सामना अंतिम फेरीचा असेल.
सुपर-४ मध्ये सध्या परिस्थिती काय?
सुपर ४ गुणांच्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानला ६ गडी राखून पराभूत केल्यानंतर भारत पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. भारताचे २ गुण आहेत आणि त्यांचा रन रेट (०.६८९) आहे. पाकिस्तान गुणतालिकेत तळाशी आहे. कारण त्यांचा रन रेट (-०.६८९) आहे. तर सुपर ४ फेरीत १-१ सामना खेळल्यानंतर, बांगलादेश दुसऱ्या स्थानावर आहे, तर श्रीलंका तिसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशचा रन रेट चांगला असून त्यांचे २ गुण आहेत.