आज आशिया कपमधील हायव्होल्टेज सामना होत आहे. पाकिस्तान एकदा अपमानित होऊन पुन्हा एकदा भारताविरोधात खेळणार आहे. पाकिस्तानी खेळाडू पराभवाचाच नाही तर झालेल्या अपमानाचा बदला घेण्याच्या इर्शेने हा सामना खेळणार आहेत. तर भारतीय संघ आजही पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणार नाही, असा अंदाज वर्तविला जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाला काहीही करून हा सामना जिंकावाच लागणार आहे.
भारतीय संघ आज सुपर-4 राउंडमध्ये पहिला सामना खेळणार आहे. पुन्हा पाकिस्तानी संघ समोर आलेला आहे. फायनलमध्ये देखील पाकिस्तानसोबत दोन हात करावे लागणार आहेत. अशातच भारताची प्लेईंग ११ कशी असेल, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत.
गेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात हस्तांदोलन न करण्यावरून वाद झाला होता. पाकिस्तानने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना हटविण्याची मागणी केली होती. हेच पायक्रॉफ्ट आजच्याही सामन्याचे सामनाधिकारी असणार आहेत. याच्या निषेधार्थ पाकिस्तानने कालची मॅचपूर्व पत्रकार परिषदही रद्द केली होती. परंतू, आयसीसीने एक ऐकलेले नाही. अशातच पाकिस्तानला भारतासोबत लढावे लागणार आहे.
प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण कोण असतील यावरून मोठी अपडेट येत आहे. भारताच्या आतापर्यंत तीन मॅच झाल्या आहेत. एकाही खेळाडूला तिन्ही सामन्यांत मिळून १०० रन्सही पूर्ण करता आलेले नाहीत. अशातच शुबमन गिल सर्वात खालच्या पातळीवर आहे. त्याने एकूण ३५ रन्स बनविले आहेत. संजू सॅमसनला वगळून त्याच्याजागी गिलला सलामीला पाठविण्यात आले होते. यामुळे या सामन्यात गिलचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे. सॅमसनने एकाच सामन्यात ५६ रन्स काढून गिलपेक्षा आपण किती सरस आहोत, हे दाखवून दिले होते.
गिलला उपकप्तान बनविल्याने पदाच्या इज्जतीसाठी त्याला खेळवावे लागत आहे. परंतू, या सामन्यात गिलला परत संधी दिली जाते की संजू सॅमसनला त्याची जागा परत मिळते, हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.