मुंबई : भारतात सुरू असलेला वन डे विश्वचषक आता अंतिम टप्प्यात आला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात यजमान भारताने दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. हा सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते मैदानावर उपस्थित होते आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरही जबरदस्त रेकॉर्डब्रेक आकडेवारी समोर आली. मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला गेला.
खरं तर वन डे विश्वचषकाच्या सुरूवातीला चाहत्यांनी स्पर्धेकडे पाठ फिरवल्याचे दिसले. किंबहुना भारताचे सामने वगळता मैदानात प्रेक्षकांची संख्या म्हणावी तशी दिसली नाही. पण डिस्ने प्लस हॉटस्टार या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून चाहत्यांनी स्पर्धेचा आनंद लुटला. कालच्या भारताच्या सामन्यात प्रेक्षकसंख्येचे अनेक विक्रम मोडले गेले. लक्षणीय बाब म्हणजे पहिला उपांत्य सामना ५.३ कोटी लोकांनी एकाच वेळी पाहिला असून नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारचे प्रमुख सजित शिवनंदन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
शिवनंदन यांनी सांगितले की, टीम इंडियाने सलग १० विजय मिळवून केवळ विक्रमच मोडले नाहीत तर भारतीय चाहत्यांना Disney + Hotstar वर देखील आकर्षित केले आहे. भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा उपांत्य सामना ५.३ कोटी चाहत्यांनी पाहिला, जो ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा १.५ पट जास्त आहे.
भारताची फायनलमध्ये धडक
न्यूझीलंडला पराभूत करून भारतीय संघाने फायनलचे तिकिट मिळवले आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेता संघ १९ तारखेला भारतासोबत अंतिम सामना खेळेल. मोहम्मद शमीने ५७ धावा देत ७ बळी घेतले अन् संघाला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ३९७ धावांचा डोंगर उभारला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकांत ४ बाद ३९७ धावा केल्या. ३९८ धावांच्या तगड्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने चांगली सुरूवात केली. पण, मोहम्मद शमी किवी संघासाठी काळ ठरला अन् त्याने सुरूवातीलाच दोन मोठे झटके दिले. त्यानंतर डॅरिल मिचेल आणि केन विल्यमसन यांनी भागीदारी नोंदवून भारतीय चाहत्यांच्या पोटात गोळा आणला. पण, पन्हा एकदा शमी एक्सप्रेसच्या स्विंगने न्यूझीलंडचा संघ चीतपट झाला आणि भारताने ७० धावांनी विजय साकारला.