Big Blow For India Tilak Varma Undergoes Surgery Ruled Out Of New Zealand T20Is : न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसह आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टी-२० प्रकारात खेळवण्यात आलेल्या आशिया कप स्पर्धेतील हिरो आणि मध्यफळीतील भारतीय संघाचा हुकमी एक्का तिलक वर्माची अचानक तब्येत बिघडली. पोटदुखीमुळे त्रस्त असलेल्या टेस्टिक्युलर टॉर्शनचं निदान झाल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने युवा क्रिकेटरवर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तिलक वर्माची प्रकृती स्थिर, पण...
सध्याच्या घडीला तिलक वर्माची प्रकृती स्थिर आहे, मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मैदानातील पाच सामन्यांच्या टी २० मालिकेला तो मुकणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिका २१ जानेवारीपासून सुरु होणार आहे. त्यानंतर होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत तो रिकव्हर होणार का? हा देखील एक मोठा प्रश्नच आहे.
IND vs NZ : श्रेयस अय्यरला मोठा दिलासा! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत खेळण्याचा मार्ग झाला मोकळा
तिलक वर्माची यशस्वी शस्त्रक्रिया, रिकव्हर होण्यासाठी किती वेळ लागणार?
२३ वर्षीय डावखुरा फलंदाज तिलक वर्मा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत हैदराबाद संघाचा भाग होता. ७ जानेवारी रोजी सकाळी नाश्त्यानंतर त्यांना अचानक पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्या. तत्काळ त्यांना राजकोटमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. विविध स्कॅन केल्यानंतर बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलन्स (COE) मधील डॉक्टरांकडे पाठवण्यात आले. बीसीसीआयच्या एका सूत्रानुसार, स्कॅन रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टरांनी तातडीच्या शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी तिलक वर्माला साधारणता ३ ते ४ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धची संपूर्ण टी २० मालिकेला त्याला मुकावे लागणार आहे. बीसीसीआयकडून लवकरच यासंदर्भातील अधिकृत माहिती दिली जाईल.
टी २० वर्ल्ड कप स्पर्धेचं काय?
तिलक वर्मा हा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या संघातील प्रमुख खेळाडू आहे. जर तो ७ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेपर्यंत फिट झाला नाही तर त्याच्या जागी टीम इंडियाला बदली खेळाडूची निवड करावी लागू शकते. भारतीय संघ अमेरिकेविरुद्धच्या लढतीने वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात करणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाने कोणत्याही राखीव खेळाडूच्या नावाची घोषणा केलेली नाही. जर तिलक वर्मा फिट नसेल तर त्याच्या जागी कुणाला संधी द्यायची याचा निर्णय बीसीसीआयला घ्यावा लागेल.