चेन्नई : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान ५० टक्के प्रेक्षकांना प्रत्यक्ष उपस्थित राहून सामना पाहण्याची परवानगी बीसीसीआय आणि तामिळनाडू क्रिकेट संघटनेने दिली आहे.
भारतात नोव्हेंबर २०१९ मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना झाला होता. तब्बल वर्षभरानंतर आंतरराष्ट्रीय सामन्याचे पुनरागमन होत आहे. टीएनसीएच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. मीडियाला मात्र ५ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या पहिल्या सामन्यापासूनच वृत्तांकन करण्याची परवानगी दिली. कोरोनाच्या नव्या नियमावलीनुसार टीएनसीए आणि बीसीसीआय यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ही मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
टीएनसीएच्या पदाधिकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,‘ केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या नव्या कोरोना नियमावलीनुसार प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्याची तरतूद आहे. आम्ही सर्व नियमांचे पालन करून प्रेक्षकांना दुसऱ्या कसोटीपासून प्रवेश देणार आहोत.’ पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यादरम्यान केवळ तीन दिवसांचा वेळ आहे. या काळात प्रेक्षकांना कोरोना नियमांचे पालक करून आत जाता येईल, याबद्दल आम्ही आश्वस्त आहोत. तामिळनाडू सरकारनेदेखील राज्यात क्रिकेटसह अन्य खेळांसाठी ५० टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.
म्हणून दुसऱ्या सामन्यापासून प्रवेश
एम. ए. चिदंबरम स्टेडियमची प्रेक्षकक्षमता ५० हजार इतकी आहे. मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी सुरू होत आहे. दुसरा सामना याच ठिकाणी १३ फेब्रुवारीपासून खेळला जाईल. माध्यम प्रतिनिधी दोन्ही सामन्यांचे वृत्तांकन प्रेसबॉक्समध्ये बसून कव्हर करू शकतील. पत्रकार परिषद मात्र यापुढेही ऑनलाइनच असेल. पहिल्या सामन्यापासून प्रेक्षकांना प्रवेश देण्याचे उपाय योजण्यास फार कमी वेळ शिल्लक असल्याने आम्ही दुसऱ्या सामन्यापासून प्रवेश देण्याचे ठरविले आहे, असे टीएनसीएने स्पष्ट केले.
मोटेरावर उपस्थितीची मिळाली परवानगी
अहमदाबादच्या मोटेरा मैदानावर २४ फेब्रुवारीपासून लागोपाठ दोन कसोटी सामने खेळले जातील. या ठिकाणी एकूण क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी बहाल करण्यात आली आहे. स्टेडियमची प्रेक्षक क्षमता एक लाखाच्या वर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनादेखील उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.