भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टी-२० सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात खेळवण्यात आला. हा सामना जिंकत भारतीय संघाने मालिकेत ३-१ अशी आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे. संघाच्या विजयात हार्दिक पांड्या आणि बऱ्याच दिवसांनी टीम इंडियात कमबॅकची संधी मिळालेल्या शिवम दुबेनं महत्त्वाची भूमिका बजावली. दोघांच्या भात्यातून निघालेल्या अर्धशतकाच्या जोरावरच भारतीय संघानं निर्धारित २० षटकात ९ बाद १८१ धावांपर्यंत मजल मारली होती. या खेळीसह या जोडीनं चार वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सर्वोच्च भागीदारीसह जोडीनं घातली खास विक्रमाला गवसणी
भारतीय संघाची अवस्था ५ बाद ७९ धावा असताना ही जोडी जमली. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे दोघांनी सहाव्या विकेटसाठी ८७ धावांची दमदार भागीदारी केली. यासह जोडीच्या नावे खास विक्रमाची नोंद झाली आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सहाव्या विकेटसाठी भारताकडून त्यांनी दुसऱ्या क्रमाकांची सर्वोच्च भागीदारी उभारली आहे.
सूर्यकुमार अन् अक्षर पटेलच्या नावे आहे रेकॉर्ड
हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे या जोडीला सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमाकावरील भागीदारीची सर्वोच्च धावसंख्या उभारण्याची संधी होती. पण सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल या जोडीच्या नावावरील विक्रम अबाधित राहिला. या जोडीनं २०२३ मध्ये पुण्याच्या मैदानातच श्रीलंकेविरुद्ध ९१ धावांची भागीदारी रचली होती. अवघ्या पाच धावांनी हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे या जोडीचा टीम इंडियाकडून सर्वोच्च भागीदारी सेट करण्याचा विक्रम हुकला.
पांड्यानं दुबेच्या साथीनं मोडला कोहलीसोबत सेट केलेला विक्रम
२०२१ मध्ये हार्दिक पांड्यानं विराट कोहलीच्या साथीनं ७० धावांची भागीदारी रचली होती. कोहली सोबत सेट केलेला हा विक्रम पांड्यानं दुबेच्या साथीनं मोडीत काढला. दोघांनी ८७ धावांच्या भागीदारीसह टीम इंडियाकडून सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर दुसरी मोठी भागीदारी उभारली आहे. हार्दिक पांड्यानं ३० चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ५३ धावा केल्या. दुसरीकडे शिवम दुबेनं तेवढ्याच धावा करताना ७ चौकार आणि २ षटकार मारले. यासाठी त्याने ३४ चेंडूचा सामना केला. या दोघांशिवाय टीम इंडियाकडून अभिषेक शर्मानं २९ तर रिंकू सिंहनं ३० धावांचे योगदान दिले.