शुबमन गिलच विक्रम शतक आणि विराट कोहलीसहश्रेयस अय्यरच्या भात्यातून आलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं इंग्लंडसमोर ३५७ धावांचे धावसंख्येच टार्गेट सेट केले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. रोहित शर्माच्या १ (२) रुपात भारतीय संघाला दुसऱ्या षटकातच पहिला धक्का बसला. पण त्यानंतर उप कर्णधार शुबमन गिल आणि विराट कोहली जोडी जमली. दोघांनी शतकी भागीदारी रचत इंग्लंडच्या गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. त्यानंतर अय्यरच्या भात्यातूनही अर्धशतक आले. या तिघांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय संघानं निर्धारित ५० षटकात सर्वबाद ३५६ धावा केल्या. ही मॅच जिंकून मालिकेचा शेवट गोड करायचा असेल तर इंग्लंडला विक्रमी कामगिरी करावी लागेल. कारण या मैदानात एवढ्या धावसंख्याचा पाठलाग आतापर्यंत कुणीच केलेला नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विक्रमी धावंसंख्या उभारण्याची संधी थोडक्यात हुकली
भारतीय संघानं इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील वनडेतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. या मैदानात सर्वाधिक धावसंख्या उभारण्याचा रेकॉर्ड हा दक्षिण आफ्रिकेच्या नावे आहे. २०१० मध्ये या पाहुण्या संघानं भारतीय संघाविरुद्ध २ बाद ३६५ धावा केल्या होत्या. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. हा रेकॉर्डही तिसऱ्या सामन्यात मागे पडेल असे वाटत होते. पण अखेरच्या टप्प्यात भारतीय संघाने ठराविक अंतराने विकेट गमावल्या अन् भारतीय संघाचा डाव ३५६ धावांवरच आटोपला.
गिल-कोहली यांच्यात शतकी भागीदारी
सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या एका धावेवर तंबूत परतल्यावर शुबमन गिल आणि विराट कोहलीनं संघाला मजबूत स्थितीत नेणारी भागीदारी उभारली. दुसऱ्या विकेटसाठी या जोडीनं ११६ धावांची भागीदारी रचलीय विराट कोहलीच्या रुपात टीम इंडियाला दुसरा धक्का बसला. तो ५५ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५२ धावा करून तंबूत परतला. माघारी फिरण्याआधी त्याने गिलच्या साथीनं इंग्लंडच्या संघाला बॅकफूटवर ढकलले होते.
शुबमन गिल अन् अय्यर जोडीमध्ये संघाकडून दुसरी शतकी भागीदारी
विराट कोहली माघारी फिरल्यावर उप कर्णधार शुबमन गिल याने श्रेयस अय्यरसोबत तोऱ्यात बॅटिंग सुरुच ठेवली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १०४ धावांची दमदार भागीदारी रचली. दरम्यान शुबमन गिलनं आपल्या कारकिर्दीतील ७ वे शतक झळकावले. नरेंद्र मोदी स्टेडियमवर तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक झळकवण्याचा खास विक्रमही त्याने आपल्या नावे नोंदवला. तो १०२ चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ११२ धावा केल्या. अय्यरनं ६४ चेंडूत ७८ धावांची खेळी करताना इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील दुसर अर्धशतक झळकावले.
लोकेश राहुलला मिळाली पाचव्या क्रमांकावर खेळण्याची संधी
पहिल्या दोन सामन्यात फलंदाजीला पुरेशी संधी न मिळालेला लोकेश राहुल यावेळी लवकर बॅटिंगला आला. पाचव्या क्रमांकावर येऊन त्याने ४० धावांची उपयुक्त खेळी केली. हार्दिक पांड्या १७ (९), अक्षर पटेल १३ (१२), वॉशिंग्टन सुंदर १४ (१४), हर्षित राणा १३(१०), अर्शदीप २ (२) आणि कुलदीप यादव याने नाबाद १ धाव केली. इंग्लंडकडून आदिल रशीदनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. याशिवाय मार्क वूडला दोन तर साकीब महमूद, गस आणि जो रुट यांच्या खात्यात प्रत्येकी एक एक विकेट जमा झाली.