Virat Kohli Breaks Sachin Tendulkar's Record : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या भात्यातून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी अर्धशतक पाहायला मिळाले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात त्याने ५५ चेंडूत ५२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ही खेळी मोठी करण्यात तो अपयशी ठरला असला तरी या छोट्याखानी अर्धशतकी खेळीसह त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. जाणून घेऊयात किंग कोहलीनं अर्धशतकी खेळीसह साधलेल्या विक्रमी कामगिरीसंदर्भातील सविस्तर स्टोरी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोहलीनं मास्टर ब्लास्टर सचिनला टाकलं मागे
आंतरारष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात इंग्लंड विरुद्ध ४००० धावांचा टप्पा कोहलीनं पार केला. हा पल्ला गाठणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी इंग्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावे होता. तेंडुलकरनं आपल्या कारकिर्दीतील ६९ सामन्यातील ९० डावात ३९९० धावा केल्या होत्या. कोहलीनं ८७ सामन्यातील १०९ डावात सचिनला मागे टाकत ४ हजार धावांचा पल्ला गाठला.
इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कुणाच्या नावे?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड ऑस्ट्रेलियन दिग्गज डॉन ब्रॅडमन यांच्या नावे आहे. या दिग्गजाने इंग्लंड विरुद्ध ३७ सामन्यात ५०२८ धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध ५००० धावा करणारा हा एकमेव फलंदाज आहे. या सर्व धावा कसोटीत आल्या आहेत.
इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
- सर डॉन ब्रॅडमन : ३७ सामन्यांमध्ये ५०२८ धावा
- अॅलन बॉर्डर : ९० सामन्यांमध्ये ४८५० धावा
- स्टीव्ह स्मिथ : ८५ सामन्यांमध्ये ४८१५ धावा
- व्हिव्ह रिचर्ड्स : ७२ सामन्यांमध्ये ४४८८ धावा
- रिकी पाँटिंग: ७७ सामन्यांमध्ये ४१४१ धावा
- विराट कोहली : ८७ सामन्यांमध्ये ४०३६ धावा
- सचिन तेंडुलकर: ६९ सामन्यांमध्ये ३९९० धावा