India vs England 2nd T20I : चेन्नईच्या मैदानात रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघानं दिमाखदार विजय नोंदवला आहे. आघाडीच्या फळीतील फलंदाजांसह अनुभवी खेळाडू स्वस्तात माघारी फिरल्यावर युवा तिलक वर्मानं सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. तो एकटा इंग्लंडच्या गोलंदाजांना नडतोय असं वाटत असताना वॉशिंग्टन आला अन् त्यानं दिलेल्या सुंदर साथीच्या जोरावर अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात टीम इंडियानं बाजी मारली. तिलक वर्मानं खणखणीत चौकार मारत संघाचा विजय निश्चित केला. या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी मजबूत आघाडी घेतली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तिलक वर्मा अन् वॉशिग्टन सुंदरची उपयुक्त भागीदारी
इंग्लंडच्या संघाने दिलेल्या १६६ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या धावफलकावर १५ धावा असताना अभिषेक वर्माची विकेट पडल्यावर तिलक वर्मा मैदानात उतरला होता. एका बाजूला विकेट्स पडत असताना दुसऱ्या बाजूनं कोणताही दबाव न घेता युवा बॅटरनं भारतीय संघाचा धावफलक हलता ठेवला. एक वेळ अशी आली होती की, तिलक वर्मा एकटा नडतोय असं चित्र निर्माण झालं होते. सामना इंग्लंडच्या बाजूनं झुकतोय असं वाटत होते. पण वॉशिंग्टन सुंदरनं १९ चेंडूत २६ धावांची खेळी करत तिलक वर्मासोबत एक चांगली भागीदारी केली. या दोघांनी ३८ धावांची भागीदारी करत सामन्याचा टोन बदलला.
शेवटपर्यंत टिकला अन् विनिंग शॉटही मारला
वॉशिंग्टन सुंदरची विकेट पडल्यावर मॅच पुन्हा फिरतीये की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. कारण अक्षर पटेल २ (३) आणि अर्शदीप सिंग ६(४) स्वस्तात तंबूत परतले. त्यानंतर रवी बिश्नोईनं तिलक वर्माला चांगली साथ दिली. तो शेवटपर्यंत मैदानात थांबला. त्यामुळं इंग्लंडच्या संघाच्या कमबॅकच्या आशा संपुष्टात आल्या. तिलक वर्मानं ५५ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७२ धावांची दमदार खेळी केली. चौकार मारत त्यानं संघाचा विजय पक्का केला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर सोडला तर अन्य गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. जोफ्राची सर्वाधिक धुलाईही तिलक वर्मानंच केली.