भारतीय संघाचा स्टार बॅटर श्रेयस अय्यर याने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात आपल्या खेळीतील धमक दाखवून दिलीये. कामगिरीतील सातत्याचा अभाव अन् आखूड टप्प्यावर खेळताना अडखळत खेळणारा मध्यफळीतील फलंदाजाला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवल्यावर बीसीसीयने करारबद्ध खेळाडूंमधूनही त्याचा पत्ता कट झाला होता. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांची 'बरसात' करत त्याने पुन्हा टीम इंडियाचे दरवाजे ठोठावले. चॅम्पियन्स ट्रॉफी आधी तो इंग्लंडविरुद्धच्या वनडेत कशी कामगिरी करणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने आपल्यातील तेवर दाखवून देत कडक अर्धशतकी खेळी केली. नागपूरच्या मैदानात अवघ्या ३० चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वनडेतील १९ वे अर्धशतक, दाखवून दिला मध्यफळीतील 'कणा' असल्याचा तोरा
नागपूरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाची सलामी जोडी स्वस्तात माघारी फिरली. भारतीय संघाच्या डावातील सहाव्या षटकात रोहितच्या रुपात दुसरी विकेट पडल्यावर श्रेयस अय्यर मैदानात आला. संघाच्या धावफलकावर त्यावेळी फक्त १९ धावा लागल्या होत्या. पहिला चेंडू निर्धाव खेळल्यावर श्रेयस अय्यरनं शाकिब महमूदच्या गोलंदाजीवर दुहेरी धाव घेत आपले खाते उघडले. या षटकात त्यानंतर त्याने एक खणखणीत चौकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. सातव्या षटकात जोफ्रा आर्चरला त्याने बॅक टू बॅक दोन कडक सिक्सर मारत भारतीय संघावरील दबाव कमी केला. आपल्या भात्यातून एक से बढकर एक फटका दाखवून देत वनडेत चौथ्या क्रमांकासाठी माझ्यापेक्षा उत्तम पर्याय असू शकत नाही, हेच त्याने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात दाखवून दिले. वनडे कारकिर्दीतील १९ अर्धशतक झळकवताना त्याने ३० चेंडूचा सामना केला.
अय्यरची वनडेतील दुसरी जलद अर्धशतकी खेळी
श्रेयस अय्यरनं नागपूरच्या मैदानात ३६ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ५९ धावांची दमदार आणि उपयुक्त खेळी केली. या सामन्यात त्याने १६४ च्या स्ट्राइक रेटनं धावा काढल्या. ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण करताना त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील दुसऱ्या क्रमांकाची जलद अर्धशतकी खेळी केली. २०१९ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे सामन्यात त्याच्या भात्यातून २८ चेंडूत अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली होती. ही त्याची वनडेतील सर्वात जलद अर्धशतकी खेळी आहे.