भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात मैदानावर येताच रोहितनं एक विक्रम नावावर केला. शंभर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामने खेळणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. पण, जगात रोहितचा दुसरा क्रमांक लागतो. या विक्रमात पाकिस्तानचा शोएब मलिक 111 सामन्यांसह आघाडीवर आहे. या कामगिरीसह रोहितनं सुनील गावस्कर आणि कपिल देव यांना मिळालेला मानही पटकावला. 
पहिल्या सामन्यात त्यानं 99 सामन्यांचा पल्ला गाठून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा 98 सामन्यांचा विक्रम मोडला होता. आता त्याला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांचे शतक साजरे करण्याची संधी आहे. भारताकडून हा मान पहिला ( पुरुष/महिला) महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं पटकावला. सर्वाधिक ट्वेंटी-20 सामने खेळणाऱ्या अव्वल पाच खेळाडूंमध्ये शोएब मलिक ( 111) , रोहित शर्मा ( 100), शाहिद आफ्रिदी ( 99), महेंद्रसिंग धोनी ( 98) आणि रॉस टेलर ( 93) यांचा समावेश आहे. शिवाय रोहितनं सुरेश रैनाचा विक्रमही मोडला. 
या ऐतिहासिक क्षणाबद्दल रोहित म्हणाला,'' इतके सामने खेळेन असं वाटलं नव्हतं. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. अनेक चढउतार आले. चुकांतून शिकत गेलो. त्यातून वाट काढत मी आज 100वा ट्वेंटी-20 सामना खेळणार आहे, याचा अभिमान आहे. ट्वेंटी-20तील चारही शतक अविस्मरणीय आहेत. यापैकी आवडती खेळी कोणती, असं नाही सांगू शकत. पण, पहिले शतक हे नेहमीच खास असतं. त्या शतकानंतर आम्ही हरलो, याचे दुःख. पण त्यानंतर झळकावलेले तीनही शतक हे टीमच्या विजयाला हातभार लावणारे ठरले. आणखी अशाच अविस्मरणीय खेळी करण्यासाठी उत्सुक आहे.''
भारताकडून 100 ट्वेंटी-20 सामने खेळण्याचा पहिला मान रोहितनं पटकावला. वन डे क्रिकेटमध्ये हा मान कपिल देव यांनी 1987 मध्ये, तर कसोटीत हा मान सुनील गावस्कर यांनी 1984 साली पटकावला होता. रोहितनं आजच्या सामन्यातून या दोन दिग्गजांच्या पंक्तित स्थान पटकावले.