भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नुकतीच एकदिवसीय मालिका समाप्त झाली असून, आता दोन्ही संघ पाच सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका खेळणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना २९ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये टी२० क्रिकेटमध्ये सामना फिरवण्याची क्षमता असलेले अनेक मास्टर खेळाडू आहेत. मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वी, टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर टाकुयात.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपर्यंत एकूण ३२ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. आकडेवारीनुसार, टी२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा वरचष्मा स्पष्टपणे दिसून येतो. भारताने २० सामने जिंकले आहेत. तर, ऑस्ट्रेलियाच्या संघाला ११ सामन्यात विजय मिळवता आला आहे. शिवाय, एक सामना अनिर्णित ठरला आहे. या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, टी२० फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाला भारतीय संघाविरुद्ध संघर्ष करावा लागला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा टी२० आंतरराष्ट्रीय सामना २०२४ च्या टी२० विश्वचषकात खेळला गेला होता, ज्यात भारतीय संघाने २४ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने एकूण २०५ धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात ४१ चेंडूत ९२ धावांची धडाकेबाज खेळी रोहित शर्मा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला होता. रोहितच्या या स्फोटक कामगिरीमुळेच भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचता आले आणि ऑस्ट्रेलियाचा संघ १८१ धावांवर गारद झाला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला टी२० आंतरराष्ट्रीय सामना २००७ मध्ये खेळला गेला होता आणि तोही भारताने १५ धावांनी जिंकला होता. या ऐतिहासिक सामन्यात युवराज सिंगने आपली ताकद दाखवून दिली होती. त्याने ३० चेंडूत ७० धावांची तुफानी खेळी केली होती, ज्यात पाच चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. या उत्कृष्ट कामगिरीसाठी युवराजला 'सामनावीराचा' पुरस्कार मिळाला होता.