ठळक मुद्देक्रिकेट ऑस्ट्रेलियाला धक्का बसलास्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावरील बंदी कायमाभारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नाही
सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या पुनरागमनासाठी प्रयत्नशील असलेल्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मंगळवारी धक्का बसला. बॉल टॅम्परिंग प्रकरणी बंदीची कारवाई झालेल्या स्मिथ, वॉर्नर आणि कॅमेरोन बॅनक्रॉफ्ट यांना दिलासा मिळालेला नाही. या तिघांवरील बंदी हटवण्यात यावी यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेली याचिका फेटाळण्यात आली.
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कसोटी मालिकेत या तिघांवर बॉल टेम्परिंगचा आरोप सिद्ध झाला होता. त्यानंतर स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर 12, तर बॅनक्रॉफ्टवर 9 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. त्यानुसार स्मिथ आणि वॉर्नर यांना मार्च 2019 पर्यंत आंरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेट खेळता येणार नाही. बॅनक्रॉफ्टवरील बंदी डिसेंबर अखेरीस संपणार आहे. या प्रकरणानंतर प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनीही पदत्याग केला होता.
जस्टीन लँगर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलिया संघाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यांनी सर्व प्रकारच्या 21 आंतरराष्ट्रीय सामन्यांत केवळ पाचच विजय मिळवले आहेत. तेही झिम्बाब्वे (3) व संयुक्त अरब अमिराती ( 2) यांच्याविरुद्ध. त्यामुळे भारतीय संघाचा सामना करण्यापूर्वी त्यांच्यावर प्रचंड दडपण आले आहे. त्यासाठीच स्मिथ व वॉर्नर यांच्यावरील बंदी हटवण्याची प्रयत्न सुरू झाले होते, परंतु त्यांना अपयश आले.