चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढत ४ मार्चला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. साखळी फेरीतील विजयी सिलसिला कायम ठेवून मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयसीसीच्या स्पर्धेतील सेमीतील आपला दबदबा कायम ठेवण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल.
कसा आहे टीम इंडियाचा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सेमीतील रेकॉर्ड
दुसऱ्या बाजूला आयसीसी स्पर्धेत नेहमीच टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरलेला ऑस्ट्रेलिया संघ आहे. त्यामुळे फायनलच्या प्रवास निश्चित करण्यासाठी टीम इंडियाला सर्वोच्च कामगिरी करून दाखवावी लागेल. इथं एक नजर टाकुयात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सेमीतील भारतीय संघाच्या आतापर्यंतचा रेकॉर्ड कसा आहे त्यासंदर्भातील माहिती
सेमी फायनलमधील भारताची जमेची बाजू
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय संघाने पाच सेमी फायनल लढती खेळल्या आहेत. यातील चार सामन्यात टीम इंडियाने दिमाखात विजय नोंदवत फायनल खेळलीये. तर एका मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सेमी फायनलमध्ये भारताची जमेची बाजू ही की, १९९८ नंतर ज्या ज्या वेळी भारतीय संघ या स्पर्धेच्या सेमीत पोहचलाय त्या त्या वेळी भारतीय संघाने बाजी मारलीये. २००४, २००६ आणि २००९ या तीन हंगामात टीम इंडिया नॉक आउटपर्यंत पोहचू शकली नव्हती.
आतापर्यंतच्या सेमीतील भारतीय संघाची कामगिरी
२०१७ च्या गत हंगामात भारतीय संघाने सेमीत बांगलादेशला पराभूत करत फायलन गाठली होती. शेवटी पाकिस्तानने फायनल डाव मारला होता. त्याआधी २०१३ मध्ये भारतीय संघानं सेमीत श्रीलंकाला मात दिली होती. २००२ च्या हंगामात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला दणका दिला होता. रेकॉर्ड भारताच्या बाजूनं असला तरी नॉक आउट लढतीत ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड चांगला आहे. त्यामुळे दोन्ही संघात काँटे की टक्कर पाहायला मिळेल.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील ICC नॉकआउट मॅचमधील रेकॉर्ड
आयसीसी नॉकआउट मॅचेसमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत ८ वेळा आमना सामना झालाय. दोन्ही संघांनी प्रत्येकी ४-४ वेळा बाजी मारलीये. इथं दोन्ही संघ बरोबरीनं दिसत असले तरी आयसीसीच्या मागील ३ नॉकआउट मॅचेसमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला धक्का दिला आहे. ते विसरून ऑस्ट्रेलिया विरुद्ध नॉकआउटमध्ये आघाडी घेण्याची संधी साधण्यासाठी टीम इंडिया जोर लावेल.