Join us

ऋतु'राज'! १३ चौकार, ७ षटकारांसह गायकवाडने झळकावले पहिले शतक, ऑस्ट्रेलियाची धुलाई

India vs Australia 3rd T20I Live : २४ धावांवर २ फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव व ऋतुराज गायकवाड यांनी टीम इंडियाच्या डावाला आकार दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 20:43 IST

Open in App

India vs Australia 3rd T20I Live : २४ धावांवर २ फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव व ऋतुराज गायकवाड यांनी टीम इंडियाच्या डावाला आकार दिला. सूर्याच्या फटकेबाजीनंतर ऋतुराजने हात मोकळे केले अन् दमदार शतक झळकावले आणि ऑस्ट्रेलियासमोर तगडे आव्हान उभे केले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर सामन्यावरील पकड सुटताना पाहण्यापलीकडे कोणताच पर्याय उऱला नव्हता. ऋतुराजने चौथ्या विकेटसाठी तिलक वर्मासह तिहेरी धावा जोडल्या. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त शतक झळकावणारा ऋतुराज नववा भारतीय ठरला. 

तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू हेड याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.  यशस्वी जैस्वाल आज ६ धावांवर जेसन बेहरनडॉर्फच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. इशान किशनला ५ चेंडू खेळवून झाय रिचर्डसनने भोपळ्यावर माघारी पाठवले. भारताला २४ धावांवर २ धक्के बसले होते. कर्णधार सूर्यकुमार यादवने जोरदार फटकेबाजी करून टीम इंडियावरील दडपण हलके केले. ऋतुराज गायकवाड संयमी खेळ करून त्याला उत्तम साथ देताना दिसला आणि दोघांनी नवव्या षटकात अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. सूर्याने मारलेल्या सुपला शॉटचे आर अश्विनने ट्विट करून कौतुक केले. सूर्या व ऋतूने पहिल्या १० षटकांत टीम इंडियाला ८२ धावांपर्यंत नेले. ११व्या षटकात आरोन हार्डीने ही जोडी तोडली. सूर्यकुमार २९ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारासह ३९ धावांवर झेलबाद झाला आणि ऋतुराजसह त्याची ५७ ( ४७ चेंडू) धावांची भागीदारी तुटली. तिलक वर्माला आज मोठी खेळी करण्याची संधी मिळाली आणि त्याने सुरुवात दणक्यात केली. ऋतुराजने ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि तुफान फटकेबाजीला सुरुवात केली. त्याने ट्वेंटी-२० कारकीर्दितील सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आज केली. ऋतुराजने १८व्या षटकात ६,६,४,०,६,२ अशा २५ धावा चोपल्या आणि  तिलकसह चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी पूर्ण केली. ऋतुराजने षटकाराने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील पहिले शतक पूर्ण केले. त्याने ५२ चेंडूंत ११ चौकार व ५ षटकारांसह हा टप्पा पार केला.

ग्लेन मॅक्सवेलने टाकलेल्या २०व्या षटकात ऋतुराजने ३० धावा चोपल्या आणि भारताला ३ बाद २२२ धावांपर्यंत पोहोचवले. ऋतुराज ५७ चेंडूंत १३ चौकार व ७ षटकारांसह १२३ धावांवर नाबाद राहिला. तिलकने ३१ धावा करताना ऋतुराजसह ५९ चेंडूंत १४१ धावांची भागीदारी केली.  

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऋतुराज गायकवाडसूर्यकुमार अशोक यादव