साऊदम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. अफगाणिस्तान : हिटमॅन रोहित शर्मानं अफगाणिस्तानविरुद्ध नकोसा विक्रम नोंदवल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं दमदार खेळी केली. त्याने या सामन्यात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा संयमाने सामना करताना अर्धशतक पूर्ण केले. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याचे हे सलग तिसरे अर्धशतक ठरले. त्याने ऑस्ट्रेलिया ( 82) आणि पाकिस्तान ( 77) यांच्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धही अर्धशतक झळकावले. कोहलीची ही खेळी विक्रमी ठरली. 27 वर्षांनंतर भारतीय कर्णधाराने प्रथमच सलग तीन सामन्यांत अर्धशतक करण्याचा पराक्रम केला. यापूर्वी 1992साली मोहम्मद अझरूद्दीनने सलग तीन अर्धशतकं झळकावली होती.
रोहित शर्मानं मिळवला नकोसा मान; अफगाणिस्तानच्या फिरकीची कमालवर्ल्ड कप स्पर्धेच्या तीन सामन्यांत दोन शतके आणि एक अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माला अफगाणिस्तानविरुद्ध मोठी खेळी करण्यात अपयश आले. मुजीब उर रहमानच्या कॅरम बॉलवर रोहितचा त्रिफळा उडाला. डावाच्या पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रहमानने अप्रतिम चेंडू टाकून रोहितला अवघ्या एका धावेवर माघारी पाठवले. या विकेटसह रोहितने आपल्या नावावर नकोस विक्रम नोंदवला. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाच्या फिरकीपटूंना भारतीय फलंदाजांना बाद करता आलेले नाही, परंतु अफगाणिस्तानच्या रहमानने ती कामगिरी करून दाखवली. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये फिरकीपटूकडून बाद होणारा रोहित हा पहिला भारतीय ठरला आहे.