साऊदम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. अफगाणिस्तान : वर्ल्ड कप स्पर्धेच्या तीन सामन्यांत दोन शतके आणि एक अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माला अफगाणिस्तानविरुद्ध मोठी खेळी करण्यात अपयश आले. मुजीब उर रहमानच्या कॅरम बॉलवर रोहितचा त्रिफळा उडाला. डावाच्या पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रहमानने अप्रतिम चेंडू टाकून रोहितला अवघ्या एका धावेवर माघारी पाठवले. या विकेटसह रोहितने आपल्या नावावर नकोस विक्रम नोंदवला. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाच्या फिरकीपटूंना भारतीय फलंदाजांना बाद करता आलेले नाही, परंतु अफगाणिस्तानच्या रहमानने ती कामगिरी करून दाखवली. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये फिरकीपटूकडून बाद होणारा रोहित हा पहिला भारतीय ठरला आहे.
![]()
रोहितने वर्ल्ड कप स्पर्धेत 3 डावांत एकूण 319 धावा चोपल्या आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 122,तर पाकिस्तानविरुद्ध 140 धावांचा पाऊस पाडला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 57 धावा केल्या. अफगाणिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लोकेश राहुल व रोहित ही जोडी मोठी धावसंख्या उभारेल अशी अपेक्षा होती, परंतु पाचव्या षटकात रोहित त्रिफळाचीत झाला. यापूर्वीच्या तीन सामन्यांत भारतीय फलंदाजांविरुद्ध प्रतिस्पर्धी फिरकीपटूंनी 53 षटकं टाकली. त्यावर भारताने 6.39च्या सरासरीनं एकही विकेट न गमावता 339 धावा केल्या. फिरकी गोलंदाजीवर बाद होणारा रोहित हा पहिलाच भारतीय ठरला.