बंगळुरु: भारत आणि अफगाणिस्तानच्या संघात चिन्नास्वामी स्टेडियमवर ऐतिहासिक कसोटी सामना रंगला आहे. सलामीवीर मुरली विजय आणि शिखर धवन यांच्या शतकांमुळे भारतीय संघानं कसोटी सामन्यात चांगली सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानच्या संघाचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना आहे. या सामन्याच्या पहिल्या अडीच तासांमध्ये अनेक विक्रम रचले गेले आहेत.
- कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी लंच टाईमच्या आधीच भारतीय सलामीवीर शिखर धववनं 104 धावा केल्या होत्या. याआधी कोणत्याही भारतीय खेळाडूला लंच टाईममध्ये शतक साजरं करता आलं नव्हतं. याआधी अशी किमया जगातील पाच फलंदाजांनी साधली आहे.
- भारताचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिकला सर्वाधिक कसोटी सामन्यानंतर संघात स्थान मिळालं. त्याला तब्बल 87 कसोटी सामन्यानंतर संघात संधी मिळाली. याआधी हा विक्रम पार्थिव पटेलच्या नावावर होता. त्याला 83 कसोटी सामन्यानंतर संघात स्थान मिळालं होतं.
- अफगाणिस्तानच्या संघाचा युवा गोलंदाज मुजीब-उर-रहमान 21 व्या शतकात जन्मलेला पहिला असा खेळाडू ठरला आहे, ज्यानं कसोटी संघात पदार्पण केलं आहे. 21 व्या शतकातील कोणत्याही खेळाडूनं अद्याप कसोटी पदार्पण केलेलं नाही.
- यमीन अहमदजाई अफगाणिस्तानकडून आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पहिली विकेट घेणारा खेळाडू ठरला. त्यानं शतकवीर शिखर धवनला बाद केलं.
- भारतात पहिल्यांदाच जून महिन्यात कसोटी सामना खेळला जात आहे. आता फक्त मे आणि जुलै महिन्यात भारतात कसोटी सामना खेळवण्यात आलेला नाही.