केपटाऊन - येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा डाव 130 धावांमध्ये आटोपला. पहिल्या डावात 76 धावांनी पिछाडीवर असलेल्या भारताला कसोटी सामना जिंकण्यासाठी 208 धावांची गरज आहे. पहिल्या डावांप्रमाणेच दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी प्रभावी मारा करत आफ्रिकेच्या फलंदाजांना बाद केले.
तिसऱ्या दिवशी पावसामुळं खेळ होऊ शकला नव्हता. पण तिसऱ्या दिवशी आलेल्या पावसाचा भारतीय गोलंदाजांनी चांगलाच फायदा घेतला. शमीनं चौथ्या दिवशीच्या दुसऱ्याच षटकांमध्ये धोकादायक हाशीम आमलाला बाद केलं. आमला बाद झाल्यानंतर आफ्रिकेची फलंदाजीची फळी पूर्णपण कोलमडली. एबी डीव्हिलर्सनं शेवटी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण इतर फलंदाज आपल्या विकेट बहाल करत असल्यामुळं शेवटी एबीचाही संयम तुटला. आणि मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटीच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेची भारतीय गोलंदाजीसमोर बिकट अवस्था झाली आहे. 41.2 षटकांत सर्वबाद 130 धावांपर्यंत मजल मारता आली. डीव्हिलर्स 35 आणि एल्गर 25 चा अपवाद वगळता एकाही आफ्रिकेच्या फलंदाजाला भारतीय गोलंदाजीसमोर उभं राहता आलं नाही. भुवनेश्वर कुमारने केशव महाराजला बाद करत दुसऱ्या डावातील आपली पहिली विकेट घेतली आहे. भुवीने महाराजला यष्टीरक्षक सहाकडे झेल देण्यास भाग पाडले. भुवनेश्वरनं दोन्ही डावात सहा बळी घेतले. तर बुमराह आणि शमीनं प्रत्येकी चार चार बळी घेतले. हार्दिक पांड्याने तीन आणि अश्विननं दोन बळी घेतले.