India U19 vs South Africa U19 2nd Youth ODI : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या यूथ वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवण्यासाठी जेसन वॉलेस रोल्स हा एकटा पडला. त्याने केलेल्या शतकी खेळीशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या अन्य कोणत्याही फलंदाजाचा भारतीय गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. परिणामी दक्षिण आफ्रिकेचा संघ ४९.३ षटकात २४५ धावांवर आटोपला. भारताकडून किशन कुमार सिंग याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून एक सेंच्युरी, पण...
पहिल्यांदा फलंदाजी करताना शंभरीच्या आत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आघाडीचे चार विकेट्स गमावल्या होत्या. ४ बाद ९६ अशी धावसंख्या असताना जेसन वॉलेस रोल्स याने संघाचा डाव सावरणारी खेळी केली. त्याने डॅनियल बॉस्मनच्या साथीनं पाचव्या विकेटसाठी ९७ धावांची भागादीरी रचली. या भागीदारीच्या जोरावरच युवा दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २०० धावांचा आकडा पार केला. जेसन वॉलेस रोल्स याने ११३ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ११४ धावांची खेळी केली. डॅनियल बॉस्मन याने ६३ चेंडूंचा सामना करत संघाच्या धावफलकात ३१ धावांची भर घातली.
गोलंदाजीत किशन कुमार सिंगचा 'चौकार'
भारताकडून किशान कुमार सिंग याने प्रतिस्पर्धी संघाला धक्क्यावर धक्के दिले. त्याने ८.३ षटकात ४६ धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या. त्याच्यापाठोपाठ अब्रिश याने २ तर दीपेश देवंद्रन, कनिष्क चौहान आणि खिलान पटेल यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली. भारतीय संघाने पहिला सामना जिंकत मालिकेत आधीच आघाडी घेतली आहे. हा सामना जिंकून युवा टीम इंडिया मालिका खिशात घालण्यासाठी मैदानात उतरली आहे. अंडर १९ वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने दोन्ही संघासाठी ही मालिका महत्त्वपूर्ण आहे.