१९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात खेळवण्यात येत आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करताना पाकिस्तानच्या संघानं निर्धारित ५० षटकात ७ बाद २८१ धावा केल्या. पाकिस्तानचा सलामीवीर उस्मान खान आणि कॅप्टन शाहझैब खान यांनी पहिल्या विकेटसाठी १६० धावांची दमदार भागीदारी केली. भारताकडून आयुष म्हात्रेनं ही जोडी फोडली. त्याने उस्मान खानला ६० धावांवर तंबूचा रस्ता दाखला.
आयुष म्हात्रेसह टीम इंडियाला दुसरी विकेट मिळून देणारा रिले कॅच
या विकेटशिवाय हारुन अर्शदच्या रुपात म्हात्रेनं भारतीय संघाला दुसरी विकेट मिळून दिली. या विकेटसाठी भारतीय कॅप्टन मोहम्मद अमन आणि युधजीत गुहा यांनी फिल्डिंगमध्ये कमालीचा ताळमेळ दाखवून दिला. कॅच युधजीतच्या नावे झाला असला तरी कॅप्टन मोहम्मद अमन यानेही या कॅचमध्ये मोलाचा वाचा उचलला. हा रिले कॅच दोघांच्यातील कमालीचा ताळमेळ आणि टीम स्पिरिट दाखवून देणारा होता.
पाकिस्तानकडून शाहजैब खानची दीड शतकी खेळी, पण...
पाकिस्तानकडून शाहजैब खान याने १४७ चेंडूत ५ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने १५९ धावांची सर्वोच्च खेळी केली. त्याची ही खेळी पाहून पाकिस्तानचा संघ ३०० पारचा आकडा गाठेल, असे वाटत होते. पण भारतीय गोलंदाजांनी दमदार कमबॅक करून दाखवलं. आयुष म्हात्रेच्या दोन विकेट्सशिवाय समर्थ नागराज याने भारताकडून सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. बेस्ट कॅचसह एका विकेट्समध्ये योगदान देणाऱ्या युधजितनंही आणि किरण घोरमले यांनी गोलंदाजीत प्रत्येकी एक एक विकेट घेतली. तळाच्या फलंदाजीतील फ्लॉप शोमुळे पाकिस्तानचा डाव २८१ धावांपर्यंत पोहचू शकला.