India tour of South Africa: बीसीसीआयशी कितीही मतभेद असले तरी त्याचा परिणाम संघावर होऊ द्यायचा नाही, ही खबरदारी विराट कोहली ( Virat Kohli) घेताना दिसतोय.  वन डे कर्णधारपदावरून अचानक हटवल्यानंतर नाराज झालेल्या विराटनं दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी BCCIची पोलखोल केली. त्यानंतर BCCI vs Virat Kohli, Sourav Ganguly Vs Virat Kohli असा सामना रंगताना दिसू लागलाय. पण, दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचा विराटचा निर्धार या वादांमुळे कमी झालेला नाही. संघातील वातावरण हसतं खेळतं ठेवण्यासाठी तो सहकाऱ्यांसोबत मुंबई ते जोहान्सबर्ग या प्रवासात मजामस्ती करताना दिसला. याआधी  BCCIनं पोस्ट केलेल्या फोटोत विराट नसल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या, परंतु या व्हिडीओनं त्याला पूर्णविराम नक्की मिळेल.
भारतीय संघ गुरुवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना झाला. मुंबई ते जोहान्सबर्ग या प्रवासात भारतीय खेळाडू फुल टू धमाल करताना दिसले. BCCIनं या प्रवासाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, त्यात विराट कोहली जलदगती गोलंदाज इशांत शर्माची फिरकी घेताना दिसतोय. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर हेही विराटच्या मस्तीचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत. आफ्रिकेतील रेसॉर्टमध्ये दाखल होताच अय्यरनं तेथील पारंपरिक प्रकारचा डान्सही केला. चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे हेही रिलॅक्स मूडमध्ये दिसले.  
ओमायक्रॉनचे संकट असतानाही भारतीय  संघ आफ्रिका दौऱ्यावर गेला आहे. तेथे त्यांना एक दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे. १८ सदस्यीय भारतीय शंघाची कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सराव करण्याची मुभा मिळणार आहे.  श्रेयस अय्यर, रिषभ पंत आणि मोहम्मद शमी यांनी सोशल मीडियावर आफ्रिकेतील फोटो पोस्ट केले आहेत. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिनंही इंस्टा स्टोरीवर फोटो पोस्ट केले आहेत. भारताला कसोटी इतिहासात दक्षिण आफ्रिकेत   ८ दौऱ्यांवर एकही मालिका जिंकता आलेली नाही. यंदाच्या ३ सामन्यांच्या मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे.  
भारताचा कसोटी संघ - विराट कोहली (कर्णधार), प्रियांक पांचाळ, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्वीन, जयंत यादव, इशांत शर्मा,  मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज; राखीव - नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्झान नगवास्वाला  
भारत-दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक
पहिली कसोटी - २६ ते ३० डिसेंबर, दुपारी १.३० वाजल्यापासून, सेंच्युरियन
दुसरी कसोटी - ३ ते ७ जानेवारी, २०२२, दुपारी १.३० वाजल्यापासून, जोहान्सबर्ग
तिसरी कसोटी - ११ ते १५ जानेवारी, २०२२, दुपारी २ वाजल्यापासून, केप टाऊन