आशिया कप २०२५ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या ढाका येथे २५ जुलै २०२५ रोजी आयोजित आशियाई क्रिकेट परिषदेच्या (ACC) बैठकीवर संकटाचे सावट निर्माण झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह (BCCI) अन्य काही क्रिकेट बोर्डाकडून या बैठकीवर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आम्ही येणार नाही; BCCI नं स्पष्ट केली आपली भूमिका
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने ACC आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना यासंदर्भात अधिकृतरित्या सूचना दिली आहे. जर ही बैठक ढाका येथेच होणार असेल तर आम्ही उपस्थितीत राहणार नाही, अशी स्पष्ट भूमिका बीसीसीआयने घेतली आहे. भारत-बांगलादेश यांच्यातील तणावूर्ण राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर BCCI नं हा निर्णय घेतल्याचे समजते.
मिताली ते स्मृती! जाणून घ्या वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय 'रन'रागिणींचा खास रेकॉर्ड
अन्य आशियाई क्रिकेट बोर्डानेही घेतलाय आक्षेप, पण...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशिवाय श्रीलंका, ओमान आणि अफगानिस्तान क्रिकेट बोर्डाकडूनही बैठकीच्या ठिकाणावर आक्षेप नोंदवल्याची चर्चा आहे. ढाका येथे आयोजित बैठकीला सदस्यांचा विरोध असताना ACC आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी तिथेच बैठक घेण्यावर ठाम आहेत.
BCCI च्या निर्णयामुळे पाकचा डाव पुन्हा फसणार?
भारतीय क्रिकेट बोर्डावर दबाव टाकण्याच्या इराद्यानेच ACC आणि PCB अध्यक्ष आशिया कप स्पर्धेसंदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक ढाका येथे आयोजित करण्याचा डाव खेळल्याचे दिसते. पण BCCI आशियाई क्रिकेट परिषदेतील प्रमुख सदस्य आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या घटनेनुसार, प्रमुख सदस्य असलेल्या बोर्डाच्या अनुपस्थितीत कोणताही निर्णय ग्राह्य ठरू शकत नाही. त्यामुळेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा विरोध हा आशियाई कप स्पर्धेवरही संकट निर्माण करणारा ठरू शकतो. संबंधित बैठकीला फक्त ५ दिवस उरले असून बैठकीचं ठिकाण बदलणार का? ते पाहण्याजोगे असेल.