Team India Playing XI for IND vs AUS 1st Test: भारतीय कसोटी संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. २२ नोव्हेंबरपासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध ५ सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका खेळणार आहे. मालिकेचा पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे होणार आहे. पण त्याआधीच भारतीय संघावर दुहेरी संकट ओढवले आहे. भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध नाही. तो दुसऱ्यांदा बाबा झाल्याने आपल्या कुटुंबासोबत भारतातच आहे. त्यासोबतच भारताचे ४ महत्त्वाचे खेळाडू जखमी असल्याचेही वृत्त होते. त्यातील काही तंदुरुस्त आहेत तर काहींची दुखापत गंभीर स्वरुपाची आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियात आधीपासूनत दाखल असलेल्या भारत-अ संघातील दोन IPL गाजवलेल्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियात थांबण्याचा निरोप बीसीसीआयने दिल्याची माहिती टीओआयच्या रिपोर्टमधून मिळत आहे.
कोण आहेत ते २ खेळाडू?
भारतीय संघाला विविध समस्यांनी ग्रासलेले आहे. आधी रोहितने पहिल्या सामन्यातून माघार घेतली होती. तर दुसरीकडे भारताचे शुबमन गिल, केएल राहुल, विराट कोहली आणि सर्फराज खान हे चार खेळाडू दुखापतग्रस्त झाले. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारत-अ संघातून खेळणाऱ्या देवदत्त पडिक्कल आणि साई सुदर्शन या दोघांना ऑस्ट्रेलियात थांबायला सांगितले आहे.
BCCI चा बॅक-अप प्लॅन काय?
"देवदत्त पडिक्कल आणि साई सुदर्शन दोघेही डावखुरे फलंदाज आहेत. भारत-अ संघातून खेळताना दोघांनाही कमी वेळेत ऑस्ट्रेलियात उल्लेखनीय कामगिरी केली. दोघांच्या फलंदाजीचे तंत्र ऑस्ट्रेलियन भूमीवर तग धरणारे होते. ऑस्ट्रेलिया-अ विरूद्ध झालेल्या सामन्यात साई सुदर्शनने १०३ धावा तर देवदत्त पडिक्कलने ८८ धावांची खेळी केली होती. दोघांनी एकूण ३९९ चेंडूंचा सामना केला. या दोघांबाबतचा अंतिम निर्णय कोच, कर्णधार आणि निवडकर्तेच घेतील, पण बीसीसीआय व्यवस्थापन पहिल्या कसोटीसाठी एका दमदार फलंदाजाला ऑस्ट्रेलियात थांबून राहण्यास सांगण्याची शक्यता दाट आहे. अभिमन्यू ईश्वरन आधीपासूनच संघात आहे, पण देवदत्त पडिक्कल किंवा साई सुदर्शनला देखील ऑस्ट्रेलियात थांबायला सांगितले जाऊ शकते", असे सूत्रांच्या हवाल्याने रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
दरम्यान, भारताच्या खेळाडूंमध्येच दोन गट करून एक तीन दिवसीय सराव सामना खेळवला गेला. त्यात गिल, विराट, सर्फराज आणि राहुल यांना दुखापत झाली होती. यातील राहुल, सर्फराज हे दोघे पूर्णपणे सावरले असून विराटची दुखापतही गंभीर नसल्याचे सांगितले जात आहे. शुबमन गिल मात्र पहिल्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले असून त्यातून सावरायला १४ दिवस लागण्याचा अंदाज आहे.
ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारताचा कसोटी संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश रेड्डी, वॉशिंगटन सुंदर