Join us

टीम इंडियाचा वेस्ट इंडिजला पराभवाचा धक्का; मुंबईकर खेळाडूची फटकेबाजी

भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 12:22 IST

Open in App

भारत विरुद्ध बांगलादेश पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली. भारताने विजयासाठी ठेवलेले 149 धावांचे लक्ष्य बांगलादेशनं 7 विकेट्स राखून सहज पार केले. मुश्फिकर रहीमच्या नाबाद 60 धावांनी बांगलादेशला विजय मिळवून दिला. बांगलादेशने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांत प्रथमच भारतीय संघाला पराभूत करण्याचा पराक्रम केला. पण, दुसरीकडे वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या भारतीय महिला संघानं यजमानांना पराभवाची चव चाखवली. मुंबईकर पूनम राऊतनं केलेली फटकेबाजी अन् फिरकीपटूंची अचुक गोलंदाजी याच्या जोरावर भारतीय महिलांनी दुसरी वन डे 53 धावांनी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवली.

मिताली राजच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. प्रिया पुनिया आणि जेमिमा रॉड्रीग्ज हे सलामीचे दोन्ही फलंदाज अवघ्या 17 धावांत माघारी परतले. त्यानंतर मितालीनं तिसऱ्या विकेटसाठी पूनमसह अर्धशतकी भागीदारी केली. मिताली 64 चेंडूंत 4 चौकारांसह 40 धावा करून माघारी परतल्यानंतर पूनम व हरमनप्रीत कौर यांनी फटकेबाजी केली. हरमनप्रीतने 52 चेंडूंत 4 चौकार लगावून 46 धावा केल्या, तर पूनमने 128 चेंडूंत चार चौकारांसह 77 धावा केल्या. त्यांच्या कामगिरीच्या जोरावर संघाने 6 बाद 191 धावांपर्यंत मजल मारली.

लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजची सलामीवीर नताशा मॅक्लीन रिटायर्ड हर्ट झाली. शेमैन कॅम्प्बेल ( 39) आणि कर्णधार स्टेफनी टेलर ( 20) हे वगळता विंडीजच्या आघाडीच्या फलंदाजांना फार काही करता आले नाही. राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत विंडीजचा डाव 47.2 षटकांत 138 धावांत गुंडाळला.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय महिला क्रिकेट संघवेस्ट इंडिजभारत