Join us  

भारत-इंग्लंड निर्णायक लढत आज

इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या निर्णायक तिस-या व अखेरच्या एकदिवसीय लढतीत या उणिवा दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 11:36 PM

Open in App

लीड्स : गेल्या लढतीत मधल्या फळीतील उणिवा चव्हाट्यावर आल्यानंतर भारतीय संघ मंगळवारी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या निर्णायक तिस-या व अखेरच्या एकदिवसीय लढतीत या उणिवा दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या लढतीत विजय मिळवला तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला सलग १० वा मालिका विजय ठरेल. नॉटिंघममध्ये पहिल्या लढतीत ८ गडी राखून विजय मिळवल्यानंतर लॉर्डस्मध्ये संघाला ८६ धावांची पराभव स्वीकारावा लागला. मालिकेत आता उभय संघ १-१ ने बरोबरीत आहेत.लंडनमध्ये विजय मिळवल्यामुळे इंग्लंडचे आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल स्थान पक्के झाले आहे. हेग्डिंग्लेमध्ये भारताने विजय मिळवला तर मानांकन गुणांतील अंतर कमी होईल आणि १ आॅगस्टपासून प्रारंभ होणा-या कसोटी मालिकेपूर्वी आत्मविश्वास उंचावण्यास मदत मिळेल. भारताने यापूर्वी टी-२० मालिकेत २-१ ने विजय मिळवला आहे.द्विपक्षीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ चांगली कामगिरी करीत आहे. जानेवारी २०१६ पासून विचार करता भारताला आॅस्ट्रेलियामध्ये १-४ ने पराभव स्वीकारावा लागला होता, पण त्यानंतर प्रत्येक द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाने सरशी साधली. त्यात झिम्बाब्वे, न्यूझीलंड (दोनदा), इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका (दोनदा), आॅस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांना मायदेशात व त्यांच्या मैदानावरही पराभूत केले आहे. भारताकडे भारताला इंग्लंडविरुद्ध वर्चस्व राखण्याची ही आणखी एक संधी आहे. कारण भारताने २०११ नंतर या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध द्विपक्षीय मालिका गमावलेली नाही. सात वर्षांपूर्वी येथे ०-३ ने पराभवानंतर भारताने वर्चस्व कायम राखले आहे.फिरकी गोलंदाजीची चर्चा करता भारतीयांनी छाप पाडली, पण वेगवान गोलंदाजांना अपयश आले, विशेषत: डेथ ओव्हर्समध्ये. लॉर्डस्मध्ये अखेरच्या ८ षटकांत भारताने ८२ धावा बहाल केल्या. त्यात उमेश यादव, सिद्धार्थ कौल व हार्दिक पांड्या यांनी सहा षटकांमध्ये ६२ धावा दिल्या. भारताला भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमराह यांची उणीव भासली. >गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये पालेकल येथे २३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची ७ बाद १३१ अशी अवस्था झाली होती. त्यावेळी भुवनेश्वरने महेंद्रसिंग धोनीच्या साथीने सामना जिंकून देताना अर्धशतकी खेळी केली होती. दक्षिण आफ्रिकेतही त्याने तळाच्या फळीत महत्त्वाचे योगदान दिले होते. भारताची मधली फळी दडपणाखाली आहे. कारण चौथ्या क्रमांकावर भारताला स्थायी खेळाडूचा शोध घेता आलेला नाही.>प्रतिस्पर्धी संघइंग्लंड :- इयोन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, जोस बटलर, मोईन अली, जो रूट, जॅक बॉल, लियान प्लंकेट, बेन स्टोक्स, आदिल राशिद, डेव्हिड विली, मार्क वुड आणि जेम्स विंस.भारत :- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, सिद्धार्थ कौल, अक्षर पटेल, उमेश यादव, शार्दुल ठाकूर व भुवनेश्वर कुमार.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडभारतइंग्लंडविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ