Abhishek Sharma Tilak Varma Arshdeep Play India A vs Australia A, 2nd Unofficial ODI : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारत 'अ' संघ कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया 'अ' संघाविरुद्ध दुसरा वनडे सामना खेळणार आहे. सलग दुसऱ्या सामन्यातील विजयासह भारतीय संघ ३ सामन्यांची अनऑफिशियल वनडे मालिका आपल्या खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यर आणि प्रियांश आर्य या दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला १७१ धावांनी पराभूत केले होते. आता दुसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ मोठ्या बदलासह मैदानात उतरणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अभिषेक शर्मा-तिलक वर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी सज्ज
आशिया कप स्पर्धा गाजवणाऱ्या अभिषेक शर्मासहतिलक वर्माची भारत 'अ' संघात वर्णी लागली आहे. गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि हर्षित राणाचाही संघात समावेश करण्यात आला आहे. शतकवीर प्रियांश आर्य दुसऱ्या सामन्यात नसला तरी त्याच्या बदली खेळाडूच्या रुपात तगडी रिप्लेसमेंट मिळाल्यामुळे भारतीय संघ आणखी मजबूत झाल्याचे दिसते. ही मंडळी घरच्या मैदानात धमाकेदार कामगिरीसह ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आपली दावेदारी ठोकण्यासाठी मैदानात उतरतील.
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
१९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौरा
भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसह टी-२० मालिका खेळणार आहे. त्याआधी भारत 'अ' संघाकडून अनेक स्टार आपल्यातील धमक दाखवून देताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात प्रियांश आर्य आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या शतकाच्या जोरावर भारतीय 'अ' ४१३ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया 'अ' संघ २४२ धावांत आटोपला होता. कामगिरीतील सातत्य कायम ठेवत भारतीय 'अ' मालिका नावे करण्याची संधी आहे.
UAE च्या मैदानात अभिषेक शर्मा अन् तिलक वर्माची हिरोगिरी
आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने निर्वाद वर्चस्व राखत सलग ७ सामन्यातील विजयासह ९ व्यांदा जेतेपद पटकावले. यंदाच्या टी-२० प्रकारात झालेल्या आशिया कप स्पर्धेत भारताकडून अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा दोघांनीही खास छाप सोडल्याचे पाहायला मिळाले. अभिषेक शर्मा या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. ३१४ धावांसह त्याने टी २० आशिया कप स्पर्धेतील एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम प्रस्थापित केला. याशिवाय तिलक वर्माने ज्या ज्या वेळी संघाला गरज होती त्या त्या वेळी दमदार कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पाकिस्तानविरुद्धच्या फायनल सामन्यात त्याने नाबाद ६९ धावांची खेळी करत भारताला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.