आज १५ ऑगस्ट. आपल्या भारत देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन. त्यामुळे हा दिवस सर्व देशवासियांसाठी खास असाच आहे. आजच्या दिवशी क्रिकेटचा सामना असेल तर देशभक्तीचा रोमांच हा द्विगुणित होतो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत भारतीय क्रिकेट संघ १५ ऑगस्ट रोजी अनेकदा क्रिकेटच्या मैदानात उतरला आहे. मात्र या दिवशी शतकी खेळी करणं मात्र केवळ एका भारतीय फलंदाजाला जमलं आहे. या भारतीय क्रिकेटपटूचं नाव आहे विराट कोहली.विराट कोहली वगळता १५ ऑगस्ट रोजी शतकी मजल गाठणं एकाही भारतीय क्रिकेटपटूला जमलेलं नाही.
सन २०१९ मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील एका सामन्या विराट कोहली याने ११४ धावांची खेळी करून ही किमया साधली होती. पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेला हा सामना १४ ऑगस्ट रोजी खेळला जाणार होता. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना भारतीय वेळेनुसार १५ ऑगस्ट रोजी सुरू झाला. या सामन्यात विराट कोहलीने शतकी खेळी केली होती. त्याबरोबरच स्वातंत्र्य दिनी शतकी खेळी करणारा विराट कोहली हा पहिला भारताचा पहिला फलंदाज बनला. विराट कोहलीने केलेल्या या शतकी खेळीच्या आधी आणि नंतर अशी कामगिरी करणं कुठल्याही भारतीय फलंदाजाला जमलेलं नाही.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीजच्या संघाने ७ विकेट्स गमावून २४० धावा बनवल्या. वेस्ट इंडीजकडून ख्रिस गेलने ४१ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने शतकी खेळी केली. त्याने ११५ च्या स्ट्राईक रेटने १४ चौकारांच्या मदतीने ११४ धावा कुटून काढल्या. तर त श्रेयस अय्यरने ६५ धावांची खेळी केली. त्याच्या जोरावर भारताने हा सामना १५ चेंडू बाकी ठेवून जिंकला.