इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ड्युरॅम काउंटी मधील चेस्टर-ल-स्ट्रीट येथील रिव्हरसाईडच्या मैदानात भारत-इंग्लंड महिला संघातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना रंगला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हरमनप्रीत कौरनं एका डावात दोन खास विक्रमाला घातली गवसणी
या सामन्यात इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीची बॅटर प्रतिका २६ (३३) आणि स्मृती मानधना ४५ (५४) यांची विकेट गमावल्यावर कर्णधार हमनप्रीत कौर फलंदाजीला आली. संघाचा डाव सावरणारी खेळी करताना तिने खास विक्रमाला गवसणी घातली. आधी तिने इंग्लंडच्या मैदानात १००० धावांचा टप्पा गाठला, त्यानंतर ३३ धावा करताच तिने वनडेत ४००० धावांचा पल्लाही पार केला.
मिताली ते स्मृती! जाणून घ्या वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय 'रन'रागिणींचा खास रेकॉर्ड
मितालीनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
इंग्लंडच्या मैदानात १००० धावा करणारी हरमनप्रीत कौर ही माजी कर्णधार मिताली राजनंतर दुसरी भारतीय बॅटर ठरली. मिताली राज हिने ४१ सामन्यातील ३९ डावात इंग्लंडच्या मैदानात ४८.५९ च्या सरासरीसह १५५५ धावा केल्या आहेत. तिच्या पाठोपाठ आता हरमनप्रीत कौर हजार पेक्षा अधिक धावा करणारी दुसरी भारतीय बॅटर आहे. या यादीत पूनम राऊत ७४१ धावांसह तिसऱ्या तर स्मृती मानधना ७१५ धावांसह चौथ्या स्थानावर आहे.
वनडेत ४००० धावांचा पल्लाही गाठला
इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हरमनप्रीत कौरनं ३३ धावा करताच वनडेत ४००० धावा करण्याचा मोठा पल्लाही पार केला. अशी कामगिरी करणारी ती मिताली राज आणि स्मृती मानधना यांच्यानंतर तिसरी बॅटर ठरलीये. मिताली राज हिने आपल्या वनडे कारकिर्दीत ७८०५ धावा केल्या आहेत. त्यापाठोपाठ स्मृती मानधना ४५८८* धावांसह दुसऱ्या स्थानावर असून हरमनप्रीत ४००० पेक्षा अधिक धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.