India vs Zimbabwe 3rd ODI Live Updates : शुबमन गिलच्या दमदार १३० धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने यजमान झिम्बाब्वेसमोर २९० धावांचे लक्ष्य ठेवले. झिम्बाब्वेत शतक झळकावणारा तो भारताचा सर्वात युवा फलंदाज ठरला, शिवाय त्याची खेळी ही भारतीय फलंदाजांमध्ये झिम्बाब्वेविरुद्धची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. शुबमने आज महान फलंदाज सचिन तेंडुलकर व हिटमॅन रोहित शर्मा यांचेही विक्रम मोडले. प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या झिम्बाब्वेला एकही चेंडू न पडता झटका बसला असता पण, Deepak Chahar ने असं काही केलं, की ज्याचं सोशल मीडियावर कौतुक होतंय...
लोकेश राहुल ( ३०) व शिखर धवन ( ४०) यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर शुबमन गिल व इशान किशन यांनी १२७ चेंडूंत १४० धावा जोडताना भारताला मजबूत धावसंख्या उभी करून दिली. इशान ५० धावांवर रन आऊट झाला. झटपट धावा करण्याच्या प्रयत्नात संजू सॅमसन ( १५) लगेच माघारी परतला. शुबमन २२ वर्ष व ३४८ दिवसांचा आहे आणि झिम्बाब्वेत शतक झळकावणारा तो भारताचा युवा फलंदाज ठरला. यापूर्वी रोहितने २३ वर्ष व २८ दिवसांचा असताना झिम्बाब्वेत शतक झळकावले होते. शुबमने १२३ धावा करताच हरारे येथे सचिन तेंडुलकरने २००१ मध्ये नोंदवलेला १२२ धावांची विक्रम तुटला. हरारे येथील ही भारतीय फलंदाजाची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. शुबमन ९७ चेंडूंत १५ चौकार व १ षटकार खेचून १३० धावांवर माघारी परतला. झिम्बाब्वेविरुद्ध ही भारतीयाची सर्वोत्तम खेळी ठरली आणि त्याने तेंडुलकरचा १९९८सालचा १२७* धावांचा विक्रम मोडला.
![]()
प्रत्युत्तरात ताकुझवानाशे कैटानो व इनोसेंट काईया ही जोडी सलामीला आली. कैटानो स्ट्राईकवर होता अन् विश्रांतीनंतर परतलेला दीपक चहर गोलंदाजीला आला. तो पहिला चेंडू टाकण्यासाठी नॉन स्ट्रायकर एंडपर्यंत पोहोचेपर्यंत काईयाने क्रिज सोडले होते. दीपक थांबला अन् मांकडिंग करून काईयाला रन आऊट केले. पण, त्याने अपील केले नाही आणि काईयाला जीवदान मिळाले. त्याचा फार फायदा झाला नाही आणि तिसऱ्या षटकात चहरने त्याला LBW कडून झिम्बाब्वेला ७ धावांवर पहिला धक्का दिला.