IND vs WI Sanju Samson Hammered 26 Ball Fifty In A Must Win Game : टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील वेस्ट इंडिज विरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात संजू सॅमसन याने २६ चेंडूत अर्धशतकी खेळीसह टीम इंडियाला मोठा दिलासा देणारी खेळी केली आहे. धावांचा पाठलाग करताना पहिल्यांदाच त्याने अर्धशतक झळकावले. टी-२० वर्ल्ड तप स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात होण्याआधी कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे या स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यात त्याच्यावर बाकावर बसण्याची वेळ आली. अभिषेक शर्माच्या रुपात नामिबियाविरुद्ध त्याला एक संधी मिळाली पण तो पुन्हा प्लेइंग इलेव्हन बाहेर गेला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाने सलामीवीराच्या रुपात संजूवर भरवसा दाखवला अन् त्यानेही दमदार खेळीसह आपल्यातील धमक दाखवून संघ व्यवस्थापनाचा निर्णय सार्थ ठरवला.
अभिषेकसह ईशान किशन बाद झाल्यामुळे अडचणीत सापडला होता संघ, मग संजूची बॅट तळपली
वेस्ट इंडिजच्या संघाने दिलेल्या १९५ धावांचा पाठलाग करताना संजूनं अभिषेक शर्माच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी २८ धावांची भागीदारी रचली. पण अभिषेक शर्मा १० धावांवर बाद झाल्यावर मैदानात उतरलेला ईशान किशनही १२ धावा करून परतला. भारतीय संघ अडचणीत असताना संजू सॅमसन याने आपल्या फलंदाजीतील धमक दाखवून देत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या साथीनं ३५ चेंडूत ५८ धावांची भागीदारी रचत टीम इंडियाला मोठा दिलासा दिला.
संजूसंदर्भात वर्ल्ड कप स्पर्धेत पाहायला मिळाला 'अंदर बाहर'चा खेळ
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाने संजू सॅमसनला पहिल्या पसंतीच्या सलामीवीराच्या रुपात संघात घेतले होते. पण सातत्याने तो एकाच पद्धतीने बाद होताना दिसला अन् टीम इंडियाने आपला प्लॅन बदलला. गत हंगामा प्रमाणे पुन्हा त्याच्यावर ही स्पर्धा बाकावरच बसून काढवी लागणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण अभिषेक शर्माची तब्येत ठिक नसल्यामुळे नामिबियाविरुद्ध त्याला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात त्याने ८ चेंडूत २२ धावांची खेळी केली. पण अभिषेक आला अन् तो पुन्हा संघाबाहेर गेला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतर टीम इंडियाने संजूकरवी डावाची सुरुवात करण्याला डाव खेळला. झिम्बाब्वेविरुद्दच्या सामन्यात संजू यंदाच्या हंगामातील दुसरा सामना खेळला. या सामन्यातही त्याने १५ चेंडूत २४ धावा केल्या. दोन्ही सामन्यातील छोट्याखानी खेळीसह त्याने इम्पॅक्ट टाकला. त्यामुळेच त्याला सेमीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सामन्यात त्याच्यावर भरवसा कायम ठेवण्यात आला. त्यानेही हा निर्णय सार्थ ठरवला आहे.