IND vs WI Sanju Samson Breaks Virat Kohli's Record : कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात झालेल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन याने आपल्या फलंदाजीतील सर्वोच खेळी साकारली. सेमीफायलसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सामन्यात संजू एकटा कॅरेबियन संघावर भारी पडला. त्याने ५० चेंडूत नाबाद ९७ धावांची खेळी करत संघाला सेमी फायनलचं तिकीट मिळवून देणारी अविस्मरणीय खेळी साकारली. त्याचे शतक अवघ्या ३ धावांनी हुकलं. पण यातही त्याने किंग कोहलीचा विराट विक्रम मोडून अख्ख्या जगाचं लक्ष वेधून घेतलं.
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील विक्रमी खेळी
धावांसाठी संघर्ष करत असल्यामुळे टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील सामन्यात बाकावर बसवण्यात आलेल्या संजूला सुपर ८ मधील महत्त्वपूर्ण लढतीत पुन्हा एकदा सलामीवीराच्या रुपात पसंती देण्यात आली. त्याने या संधीचं सोन करण्यासाठी ईडन गार्डन्सचं मैदान निवडलं. ज्या मैदानात भारतीय संघातील इतर फलंदाजांनाच नव्हे तर कॅरेबियन संघातील कुणालाच अर्धशतक झळकावता आले नाही तिथं या पठ्ठ्यानं ९७ धावांची नाबाद खेळी साकारली. त्याची ही खेळी शतकापेक्षा कमी नाही. कारण या खेळीनं टीम इंडियाचं स्वप्न जिवंत ठेवण्याचं काम केलं आहे. एवढेच नाही तर वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिली आणि कारकिर्दीत धावांचा पाठलाग करणारी मोठी खेळी करताना त्याने विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडीत काढला.
IND vs WI : एकच वादा सूर्या दादा... हवेत झेपावत अविश्वसनीय झेल घेत लुटली मैफिल (VIDEO)
कोहलीचा १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडत संजूनं प्रस्थापित केला नवा विक्रम
याआधी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत धावांचा पाठलाग करताना सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम विराट कोहलीच्या नावे होता. २०१६ मध्ये कोहलीनं मोहालीच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि २०२२ मध्ये मेलबर्नच्या मैदानात पाकिस्तानविरुद्ध नाबाद ८२ धावांची खेळी केली होती. हा विक्रम संजूनं वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात मोडीत काढला.
धावांचा पाठलाग करताना टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाच सर्वोच्च खेळीचा रेकॉर्ड
| खेळाडू | धावा | चेंडू | चौकार | षटकार | स्ट्राइक रेट | प्रतिस्पर्धी | मैदान | तारीख |
|---|
| संजू सॅमसन | ९७* | ५० | १२ | ४ | १९४ | वेस्ट इंडिज | ईडन गार्डन्स | १ मार्च २०२६ |
| विराट कोहली | ८२* | ५१ | ९ | २ | १६०.७८ | ऑस्ट्रेलिया | मोहाली | २७ मार्च २०१६ |
| विराट कोहली | ८२* | ५३ | ६ | ४ | १५४.७१ | पाकिस्तान | मेलबर्न | २३ ऑक्टोबर २०२२ |
| रोहित शर्मा | ७९* | ४६ | ४ | ६ | १७१.७३ | ऑस्ट्रेलिया | ब्रिजटाउन | ७ मे २०१० |
| विराट कोहली | ७८* | ६१ | ८ | २ | १२७.८६ | पाकिस्तान | कोलंबो (RPS) | ३० सप्टेंबर २०१२ |