India vs West Indies, 2nd ODI Live Updates : ३१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे आघाडीचे तीन फलंदाज ७९ धावांवर माघारी परतले होते. वेस्ट इंडिजला सडेतोड उत्तर देण्यासाठी टीम इंडियाला एका मजबूत भागीदारीची आवश्यकता होती. संजू सॅमसन व श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) यांनी ही गरज पूर्ण केली आणि चौथ्या विकेटसाठी ९९ धावा जोडल्या. पण, अल्झारी जोसेफने ही जोडी तोडली अन् श्रेयस अय्यर चुकीच्या निर्णयाचा शिकार बनला. भारताच्या हातात आलेला सामना श्रेयसच्या विकेटनंतर निसटतोय की काय अशी भीती निर्माण झाली.
वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना झटपट माघारी पाठवले. शिखर धवन ( Shikhar Dhawan) व शुबमन गिल यांना ११ षटकांत ४८ धावा करता आल्या. ११व्या षटकात ही भागीदारी संपुष्टात आली. धवनला ३१ चेंडूंत १३ धावांवर माघारी जावे लागले. अफलातून झेल घेणाऱ्या कायले मेयर्सने नंतर गोलंदाजीत कमाल केली. १६व्या षटकात मेयर्सच्या गोलंदाजीवर स्कूप मारण्याचा गिलने प्रयत्न केला, परंतु तो फसला अन् मेयर्सने झेल टिपला. गिल ४९ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ४३ धावांवर विचित्र प्रकारे बाद झाला. त्यानंतर पुढील षटकात मेयर्सने टीम इंडियाचा स्टार सूर्यकुमार यादव ( ९) यालाही बाद केले.
टीम इंडियाला आता एका मजबूत भागीदारीची गरज होती आणि संजू सॅमसन व श्रेयस अय्यर यांनी ती मिळवून दिली. या जोडीने संयमी खेळ करताना आधी खेळपट्टीवर स्वतःला सेट केले. संजूचे नशीब आज चांगले होते, दुसऱ्या चेंडूवर त्याचा झेल सुटला अन् LBW साठी विंडीजनं DRS न घेतल्याने संजू पुन्हा वाचला. अधुनमधून दोघांनीही चौकार-षटकार खेचले. श्रेयसने ५७ चेंडूंत ११वे अर्धशतक पूर्ण केले. संजू-श्रेयस यांची ९४ चेंडूंत ९९ धावांची भागीदारी अल्झारी जोसेफने संपुष्टात आणली. श्रेयसने मैदानावरील अम्पायरच्या LBW निर्णयाविरोधात DRS घेतला, परंतु तिसऱ्या अम्पायरनेही Umpiers call दिल्याने भारताला मोठा धक्का बसला. श्रेयस ७१ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ६३ धावांवर बाद झाला.
दरम्यान, टीम इंडियाने हा सामना २ विकेट्स राखून जिंकताना मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. शुबमन गिल ( ४३), संजू सॅमसन ( ५४), श्रेयस अय्यर ( ६३) व दीपक हुडा ( ३३) यांनी दमदार खेळ केला. अक्षर पटेलच्या झंझावातासमोर विंडीजचा पालापाचोळा झाला. अक्षरने ३५ चेंडूंत ३ चौकार व ५ षटकार खेचून नाबाद ६४ धावा करताना भारताला २ विकेट्स राखून विजय मिळवून दिला