India vs Sri Lanka, 2nd T20I : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पुण्यात श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत पत्रकाराशी मराठीत संवाद साधला. द्रविडने मराठीत बोलण्यास सुरुवात केली, पण त्याने इंग्रजीत उत्तर देऊ का अशी विनंतीही पत्रकाराला केली. पत्रकाराने विनम्रपणे भारताच्या या दिग्गजाला मराठीत बोलणे सुरू ठेवण्याचे आवाहन केले, त्यानंतर द्रविडने विनोद केला. ''मी इंग्रजीत बोलतो. लोकांना समजणार नाही. माझी मराठी माहित नाही, पण ठीक आहे,''असे द्रविड म्हणाला.
रोहित, विराट यांच्यासाठी खरंच ट्वेंटी-२० संघाचे दरवाजे बंद झाले आहेत का? राहुल द्रविडचं मोठं विधान
राहुल द्रविडचा जन्म इंदूरचा, परंतु तो लहानाचा मोठा झाला बंगळुरूमध्ये.. राहुल द्रविड हा मराठी भाषिक ब्राह्मण कुटुंबात वाढला आहे. पत्रकार परिषदेत राहुल द्रविड म्हणाला, ''या मैदानावर अनेक षटकार मारले जातात. श्रीलंकेने १४ षटकार मारले, आम्ही १२ षटकार मारले. अक्षर पटेलने वानिंदू हसरंगाविरुद्ध खणखणीत षटकार खेचले. येथे सामन्यात पुनरागमन करणे शक्य होते.''
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने कर्णधार दासुन शनाका ( २२ चेंडूत ५६ धावा) आणि सलामीवीर कुसल मेंडिस ( ३१ चेंडूत ५२ धावा ) यांच्या खेळीच्या बळावर ६ बाद २०६ केल्या. प्रत्युत्तरात अक्षर ( ६५ ) आणि सूर्यकुमार यादव (५१) यांनी ९१ धावांची भागीदारी करताना भारताच्या ५ बाद ५७ धावा असा डावाला आकार दिला. पण श्रीलंकेने १६ धावांनी हा सामना जिंकला. भारताला ८ बाद १९० धावा करता आल्या. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा सामना शनिवारी राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"