India vs Sri Lanka, 1st ODI Live : रोहित शर्मा व विराट कोहली यांचे संघातील पुनरागमन आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. भारतातच होणाऱ्या या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची आजपासून खऱ्या अर्थाने अंतिम टप्प्यातील सुरुवात झाली. रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी १४३ धावांची दमदार भागीदारी करताना संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. रोहितचे शतक थोडक्यात हुकले, परंतु त्याने विश्वविक्रमासह अनेक विक्रम मोडले.
श्रीलंकेनंतर जसप्रीत बुमराह आणखी दोन मालिकांना मुकणार? थेट आयपीएल खेळताना दिसणार
रिषभ पंतच्या दुर्दैवी अपघातामुळे इशान किशनला वन डे संघात संधी मिळेल अशी शक्यता बळावली होती. त्याने मागील वन डेत बांगलादेशविरुद्ध सर्वात जलद द्विशतक झळकावून संघातील जागेवर दावा सांगितला होता. पण, रोहितने आज सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलला खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यात ट्वेंटी-२०त तुफान फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवलाही प्लेइंग इलेव्हनपासून दूर ठेवले गेले. श्रेयस अय्यरचीही वन डे तील कामगिरी सातत्यपूर्ण झालेली आहे आणि त्याला संधी देण्याचा निर्णय घेतला. उम्रान मलिकही आज खेळतोय.
शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांनी टीम इंडियाला आश्वासक सुरूवात करून दिली. रोहितने वन डे क्रिकेटमधील ४७ वे अर्धशतक पूर्ण करताना चांगली फटकेबाजी केली. शुभमन गिलने त्याची निवड का केली गेली, हे खेळातूनच दाखवून दिले. ४५ धावांवर असताना वनिंदू हसरंगाच्या गोलंदाजीवर रोहित पायचीत होता, परंतु मैदानावरील अम्पायरने नाबाद दिल्याने तिसऱ्या अम्पायरनेही Umpire Call दिला अन् भारतीय कर्णधाराला जीवदान मिळाले. १७व्या षटकात शुभमनलाही Umpire Call ने वाचवले. त्यानंतर त्यानेही वन डेतील पाचवे अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी आक्रमक खेळ सुरू ठेवताना १९व्या षटकात १९ धावा चोपल्या. शुभमनने सलग तीन चौकार खेचले, तर रोहितने खणखणीत षटकार मारला. पुढील षटकार दासून शनाकाने भारताला पहिला धक्का दिला. शुभमन ६० चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ७० धावांवर बाद झाला अन् रोहितसोबत त्याची १४३ धावांची भागीदारीही संपुष्टात आली.
रोहितची फटकेबाजी सुरूच होती, परंतु २४व्या षटकात दिलशान मदूशंकाने ही वाटचाल रोखली. रोहित ६७ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह ८३ धावांवर माघारी परतला. बॅटची किनार घेत चेंडू यष्टींवर आदळला. रोहिने वन डे क्रिकेटमध्ये ४९च्या सरासरीने ९५०० धावा आज पूर्ण केल्या. वन डे क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत सलामीवीर म्हणून ७५०० धावा करण्याचा विश्वविक्रम त्याने नावावर करताना दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाला मागे टाकले.
रोहित शर्मा - १४९
हाशिम आमला - १५८
सचिन तेंडुलकर - १७०
सौरव गांगुली - १८२
ख्रिस गेल - १९३
भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पन्नासवेळा ५०+ धावा करून रोहितने आज सुनील गावस्कर यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. या यादीत सचिन तेंडुलकर ( ११२), विराट कोहली ( ८३), राहुल द्रविड ( ७२), महेंद्रसिंग धोनी ( ५३) आणि वीरेंद्र सेहवाग ( ५१) हे आघाडीवर आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"