भेदक गोलंदाजी आणि माफक लक्ष्याचा पाठलाग करताना फलंदाजांनी केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताच्या लेकींनी मलेशियामध्ये झालेल्या १९ वर्षांखालील मुलींच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेवर ९ विकेट्सनी मात केली. याबरोबरच भारताच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने सलद दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले.
क्वालालंपूर येथील बयूमास ओव्हलवर खेळवल्या गेलेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र भारतीय मुलींनी केलेल्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांना खेळपट्टीवर फारसा तग धरता आला नाही. अष्टपैलू त्रिशा गोंगडीसह इतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या ८२ धावांतच आटोपला. भारताकडून त्रिशा गोंगडी हिने ३ तर पारुणिका सिसोदिया, आयुषी शुक्ला आणि वैष्णवी शर्मा यांनी प्रत्येकी २ तर शबनम शकिल हिने १ बळी टिपला.
त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेलं ८३ धावांचं लक्ष्य भारतीय संघाने अवघ्या ११.२ षटकांमध्येच गाठलं. गोलंदाजीत कमाल दाखवताना ३ बळी टिपणाऱ्या त्रिशा गोंगडी हिने फलंदाजीतही चमक दाखवताना नाबाद ४४ धावांची खेळी केली. भारताकडून जी. कमलिनी आणि त्रिशा गोंगडी यांनी ४.३ षटकांमध्येच ३६ धावांची सलामी दिली. कमलिनी हिच्या रूपात भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर त्रिशा आणि सानिका चाळके यांनी दमदार कामगिरी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, त्रिशा गोंगडी हिने अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूसह संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान पटकवला.
भारताचं या स्पर्धेतील हे सलग दुसरं विजेतेपद आहे. याआधी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील मुलींच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताने शेफाली वर्मा हिच्या नेतृत्वाखाली दमदार खेळ करत विजय मिळवला होता. यावेळीही आपली विजयी घोडदौड कामय ठेवताना भारताने सात पैकी सात सामने जिंकून विजय मिळवला.
Web Title: IND Vs SA Women U19 T20 World Cup Final 2025: Indian women's team wins Under-19 World Cup by defeating South Africa
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.