रांची येथे काल खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने द.आफ्रिकेचा १७ धावांनी धुव्वा उडवला. या विजयात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्याने आपल्या कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या अफवांवर मौन सोडले.
रांची एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने १२० चेंडूत १३५ धावांची धमाकेदार खेळी केली. विराट कोहलीचे एकदिवसीय क्रिकेटमधील हे ५२ वे शतक आहे. सामन्यानंतर, त्याला विचारण्यात आले की, तो फक्त एकाच स्वरूपात खेळत राहील का? त्यावर विराट म्हणाला की, "मी आता ३७ वर्षांचा आहे. मी आता फक्त एकाच फॉरमेटमध्ये खेळेल. " विराटच्या या वक्तव्यानंतर त्याच्या कसोटी पुनरागमनाबद्दल सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागले.
सामन्याबद्दल बोलताना विराट म्हणाला की, "अशा सामन्यात खेळणे चांगले वाटते. सुरुवातीचे २०-२५ षटके खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल होती. त्यानंतर खेळपट्टी मंदावली. प्रत्येक चेंडू खेळणे आणि क्रिकेटचा आनंद घेणे हा माझा एकमेव हेतू होता. मी कधीही जास्त तयारीवर विश्वास ठेवत नाही. मी मानसिकदृष्ट्या सामन्याची तयारी करतो. मी ३०० हून अधिक एकदिवसीय सामने खेळलो आहे. तुम्ही नेट्समध्ये एक किंवा दोन तास सराव केला, तरी जाणवते की तुम्ही चांगली फलंदाजी करत आहोत. फॉर्ममध्ये नसाल तर तुम्हाला नेटमध्ये अधिक सराव करायचा आहे."
जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात द.आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताने फलंदाजी करताना विराट कोहलीच्या शानदार शतकाच्या जोरावर ५० षटकांत ८ विकेट्स गमावून ३४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ ४९.२ षटकांत ३३२ धावांवर ऑलआउट झाला. या विजयासह, टीम इंडियाने आता तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.