नवी दिल्ली: भारतीय संघाची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी सातत्याने घसरत असून, २०२४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध ३-० ने मालिका गमावल्यानंतर आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धही टीम इंडियाने २-० असा लाजिरवाणा पराभव स्वीकारला. भारतात एका वर्षात दुसरी कसोटी मालिका गमावल्यामुळे सामान्य चाहत्यांपासून ते माजी क्रिकेटपटूंपर्यंत सर्वांनी प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. याच पार्श्वभूमीवर स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीचा मोठा भाऊ विकास कोहली यानेही सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत गंभीर यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे.
विकास कोहलीने भारतीय संघाच्या या निराशाजनक कामगिरीसाठी थेट गंभीर यांच्या दादागिरीला जबाबदार धरले आहे. भारताने कोलकाता कसोटी सामना अवघ्या अडीच दिवसांत गमावला. त्यानंतर गुवाहाटी कसोटीतही भारतीय खेळाडू अपयशी ठरले. या लाजिरवाण्या पराभवानंतर त्याने सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की, "एक काळ असा होता की, आम्ही परदेशातही जिंकण्यासाठी खेळायचो. आज, आम्ही भारतात कसोटी सामने वाचवण्यासाठी खेळत आहोत. जेव्हा तुम्ही अहंकार दाखवता आणि आधीच योग्य असलेल्या गोष्टी अनावश्यकपणे बदलण्याचा प्रयत्न करता, तेव्हा असेच होते."
पुढे विकास कोहलीने टीम इंडियाच्या रणनीतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वरिष्ठ खेळाडूंना वगळणे, तसेच फलंदाजीच्या क्रमात केलेले अनावश्यक बदल, यावर त्याने आक्षेप घेतला. तो म्हणाले की, भारतीय संघातून वरिष्ठ खेळाडूंना वगळले जाते. तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या फलंदाजी क्रमांकात वारंवार बदल केला जातो. गोलंदाजाला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले जाते. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेच्या संघाने योग्य कसोटी संघाची निवड केली, यात योग्य सलामीवीर, तिसऱ्या ते पाचव्या क्रमांकावर योग्य फलंदाज, भारताच्या खेळपट्टीवर चांगली कामगिरी करू शकतील, असे फिरकी गोलंदाज आणि वेगवान गोलंदाज यांचा समावेश होता, असे मत विकास कोहलीने मांडले.
विकास कोहलीने टीम इंडिया जिंकताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, सध्याच्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे, याबद्दल प्रश्न विचारले पाहिजेत, असे त्याने म्हटले. विकास कोहलीने नंतर ह्या पोस्ट्स डिलीट केल्या असल्या तरी, टीम इंडिया व्यवस्थापनाच्या धोरणांवर आक्षेप घेण्याची ही त्याची पहिलीच वेळ नाही.