IND vs SA Test Series : भारताचा पहिल्या कसोटीत सामना करण्यापूर्वी यजमान दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. जलदगती गोलंदाज एनरिच नॉर्ट्जे ( Anrich Nortje) यानं दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी आफ्रिकेनं जलदगती गोलंदाजांच्या जोरावर टीम इंडियाला चॅलेंज दिलं होतं, त्यापैकी एक एनरिच आता कसोटी मालिकेत खेळणार नाही. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानं ( CSA) ही माहिती दिली आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील या मालिकेत आफ्रिकेला हा मोठा धक्का आबे.
''भारताविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून नॉर्ट्जेनं दुखापतीमुळे माघार घेतली आहे. कसोटी मालिकेसाठी तो पूर्णपणे बरा झालेला नाही. तो सध्या वैद्यकिय टीमचा सल्ला घेत आहे आणि त्यानुसारच त्याला विश्रांतीची गरज आहे. त्याच्या जागी संघात कोणालाही बदली खेळाडू म्हणून घेणार नाही,''असे CSA नं स्पष्ट केलं. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सुरू होत आहे.
२८ वर्षीय गोलंदाजानं १२ कसोटी सामन्यांत ४७ विकेट्स घेतल्या आहेत आणि त्यात तीन वेळा डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम त्यानं केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं चांगली कामगिरी केली होती. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्यानं मागील दोन पर्वात दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याला ६.५ कोटींत DCनं ताफ्यात घेतले होते.
दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघ - डिल एल्गर, टेम्बा बवुमा, क्विंट डी कॉक, कागिसो रबाडा, सारेल एर्वी, बेयूरन हेंड्रीक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एनगिडी, एडन मार्कराम, वियान मुल्डर, किगन पीटरसन, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, कायले वेरेयन, मार्का जान्सेन, ग्लेंटन स्टुर्मन, प्रेनेलान सुब्रायेन, सिसांडा मगाला, रियान रिकेल्टन, ड्युन ऑलिव्हर
भारत-दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक
पहिली कसोटी - २६ ते ३० डिसेंबर, दुपारी १.३० वाजल्यापासून, सेंच्युरियन
दुसरी कसोटी - ३ ते ७ जानेवारी, २०२२, दुपारी १.३० वाजल्यापासून, जोहान्सबर्ग
तिसरी कसोटी - ११ ते १५ जानेवारी, २०२२, दुपारी २ वाजल्यापासून, केप टाऊन