IND vs SA Test Ravindra Jadeja Will Break Sachin Tendulkar’s Record : भारतीय संघ गत WTC चॅम्पियन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज आहे. १४ नोव्हेंबरला कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना रंगणार आहे. या कसोटीत रवींद्र जडेजा दोन ऐतिहासिक विक्रमांच्या उंबरठ्यावर उभा आहे. हा डाव साधत तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकू शकतो. इथं एक नजर टाकुयात जड्डूच्या टप्प्यात असलेल्या त्या दोन खास विक्रमांवर...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
फक्त तीन सिक्सर मारले तर सचिन आणि झहीरलाही मागे टाकेल जड्डू
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा आघाडीवर आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २२ षटका मारले आहेत. या यादीत रवींद्र जडेजा ७ षटकारांसह सातव्या क्रमांकावर आहे. जर त्याने कोलकाता कसोटी सामन्यात ३ षटकार मारले तर एका डावात तो सचिन तेंडुलकर, झहीर खान आणि मयंक अग्रवाल या तिघांना मागे टाकेल. सचिन आणि झहीर यांच्या खात्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी ९-९ षटकारांची नोंद आहे. तर मयंक अग्रवाल याने ८ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय
- रोहित शर्मा - २२
- वीरेंद्र सेहवाग - १७
- अजिंक्य रहाणे - १४
- सचिन तेंडुलकर - ९
- झहीर खान - ९
- मयंक अग्रवाल - ८
- रवींद्र जडेजा - ७
फक्त १० धावा अन् ४००० धावांसह खास विक्रम होईल नावे
रवींद्र जडेजाने आतापर्यंतच्या आपल्या कसोटी कारकिर्दीत ८७ सामन्यातील १२९ डावात ३९९० धावा केल्या आहेत. ४००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला फक्त १० धावांची गरज आहे. हा पल्ला गाठताच कसोटीत ४००० धावा आणि ३०० विकेट्सचा डाव साधणारा तो क्रिकेट जगतातील चौथा अष्टपैलू ठरेल. याआधी कपिल देव, इयान बॉथम आणि डॅनियल व्हिक्टोरी या तिघांनीच अशी कामगिरी करून दाखवली आहे. जड्डूच्या खात्यात आतापर्यंत ३३८ विकेट्स जमा आहेत.