Hardik Pandya ruled out ICC ODI World Cup : भारताने सलग ७ विजय मिळवून उपांत्य फेरीतील जागा पक्की केली. पण, उपांत्य फेरीचा सामना खेळण्यापूर्वी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याला उर्वरित स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याचा पाय मुरगळला आणि त्यातून तो अजूनही पूर्णपणे नाही सावरला. त्यामुळे ३० वर्षीय खेळाडूला माघार घ्यावी लागत असल्याचे आयसीसीने जाहीर केले. हार्दिकच्या माघारीनंतर भारतीय संघाचा उप कर्णधार कोण, या प्रश्नाचे उत्तर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने दिले. लोकेश राहुल आता पुढील सामन्यांत उप कर्णधार असेल हे द्रविडने स्पष्ट केले.
हार्दिकच्या जागी टीम इंडियात जलदगती गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याची निवड केली गेली आहे. स्पर्धेच्या तांत्रिक समितीने प्रसिद्धच्या नावाला मान्यता दिली आहे. प्रसिद्धने केवळ १९ वन डे सामने खेळलेले आहेत. त्याच्या नावावर ३३ आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. पण, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व मोहम्मद सिराज यांच्या उपस्थितीत त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. राहुल द्रविड म्हणाला, हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्यानंतर आम्ही तीन जलदगती गोलंदाजांसह खेळतोय आणि आमच्याकडे या तीन गोलंदाजांसाठी कोणताच बॅक अप नव्हता, त्यामुळेच प्रसिद्ध कृष्णाची निवड केली गेली. आमच्याकडे सहाव्या गोलंदाजांचा पर्याय नाही, परंतु आमच्याकडे इनस्वींगर विराट कोहली आहे, जो काही षटकं टाकू शकतो ( हसत हसत)... मागील सामन्यात प्रेक्षकांनाही त्याला गोलंदाजी करताना पाहायचे होते.