IND vs SA 2nd Test Day 4 : गुवाहाटी कसोटी सामन्यातील चौथ्या दिवसाच्या खेळातील दोन्ही सत्र आपल्या नावे करत पाहुण्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलले आहे. रायन रिकल्टन ३५ (६४) आणि एडेन मार्करम २९ (६४) सलामी जोडीला तंबूत धाडल्यावर कर्णधार टेम्बा बावुमा अवघ्या ३ धावांवर बाद झाला. ट्रिस्टन स्टब्स आणि टोनी डी झोर्झी यांनी शतकी भागीदारी रचत दक्षिण आफ्रिकेला मजबूत स्थितीत घेऊन नेले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १६० चेंडूत १०१ धावांची भागीदारी रचली. टोनी झोर्झी ४९ धावा करून बाद झाल्यावर ट्रिस्टन स्टब्सनं अर्धशतक झळकावले. उपहारापर्यंत त्याने १५५ चेंडूत ६० धावा केल्या होत्या. दुसऱ्या बाजूला वियान मुल्डर ४३ चेंडूत २९ धावांवर खेळत होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडे ५०० पेक्षा अधिक धावांची आघाडी, तरी...
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ४ विकेट्सच्या मोबदल्यात २२० धावा करत ५०८ धावांची मजबूत आघाडी घेतली. तरीही कर्णधार टेम्बा बावुमानं डाव घोषित करण्याचा विचारच केलेला नाही. त्यामुळे हा सामना आता भारतीय संघासाठी जिंकणं मुश्किलच झाले आहे. इथून टीम इंडिया फक्त सामना अनिर्णित राखण्यासाठीच प्रयत्न करू शकते. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघ या सामन्यातील विजयासह २५ वर्षांची पुनरावृत्ती करत क्लीन स्वीप देण्यासाठी प्रयत्नशील असेल.
IND vs SA : कोहलीनं २० वर्षांनी घेतला होता तेंडुलकरच्या कॅप्टन्सीतील 'क्लीन स्वीप'चा बदला, पण आता...
जड्डूनं घेतल्या तीन विकेट्स!
भारताकडून गोलंदाजीत रवींद्र जडेजानं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. दोन्ही सलामीवीरांसह टोनी डी झोर्झी याला त्याने अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आपल्या जाळ्यात अडकवले. याशिवाय वॉशिंग्टन सुंदरनं टेम्बा बावुमाला स्वस्तात माघारी धाडले. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात टेम्बा बावुमा एकमेव असा फलंदाज राहिला जो दुहेरी आकडा न गाठता तंबूत परतला. दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी ५०० धावा हा एकदम सेफ स्कोअर आहे. पण तरीही ते डाव घोषित न करता भारतीय संघाला दमवण्याची चाल खेळताना दिसत आहेत. तिसऱ्या सत्रात ते किती वेळ फलंदाजी करणार? चौथ्या दिवसाअखेरच्या काही षटकात ते टीम इंडियाला बॅटिंगला बोलवणार का? ते पाहण्याजोगे आहे.