कसोटी क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर प्रमुख संघांना लोटांगण घालायला भाग पाडणारी टीम इंडिया मात्र आता संघर्ष करताना दिसत आहे. टीम इंडियाने २०१२ पासून घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावली नव्हती. परंतु, न्यूझीलंड आणि द.आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर टीम इंडियावर नामुष्की ओढावली आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने २-० ने क्लिन स्वीप देत टीम इंडियाच्या जखमेवर मीठ चोळले. या मालिकेतील शेवटचा सामना गुवाहाटी येथे खेळला गेला, जिथे भारताला ४०८ धावांनी पराभव पत्कारावा लागला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडियाचा हा सर्वात मोठा पराभव ठरला. या लाजिरवाण्या पराभवानंतर मैदानातील चाहत्यांना राग अनावर झाला आणि त्यांनी भरमैदानातच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. हा संपूर्ण प्रकार एका चाहत्याने आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला, जो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.
एवढ्या मोठ्या पराभवानंतर गुवाहाटीच्या मैदानावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये प्रेक्षक स्टँडवरून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याविरुद्ध नाराजी व्यक्त करताना 'गौतम गंभीर हाय-हाय' असे म्हणताना दिसून आले. टीम इंडियाचे खेळाडू आणि कोचिंग स्टाफ मैदानावर उपस्थित असताना चाहत्यांनी अशा घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली.
गंभीरच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाची कामगिरी
गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून टीम इंडियाने काही कामगिरी केली नाही. गंभीरच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने आतापर्यंत १९ कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी केवळ ७ जिंकले आहेत. तर, १० सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे आणि २ सामने अनिर्णित राहिले आहेत. घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेला हा क्लिन स्वीप भारतीय चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. या पराभवानंतर संघाला आता नवीन आणि मजबूत रणनीती व नियोजनाची तातडीने गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे गंभीर यांच्या कार्यशैलीवर आणि त्यांच्या भविष्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुढील कसोटी मालिका कधी?
टीम इंडिया आता २०२६ मध्ये श्रीलंकेविरुद्ध आपली पुढील कसोटी मालिका खेळणार आहे. त्यापूर्वी, टीम मॅनेजमेंटला फलंदाजीतील अपयश, गोलंदाजीतील धारदारपणाचा अभाव आणि संघ संयोजनातील त्रुटी ओळखून त्यावर काम करावे लागणार आहे.