IND vs SA Aiden Markram Pulls Off A Stunning Flying Catch : गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टीम इंडियाची अवस्था अगदी बिकट केली आहे. पहिल्या डावात शतकवीर सेनुरन मुथुसामीच्या तोडीस तोड खेळी करणाऱ्या मार्को यान्सेन याने गोलंदाजीतही पुढाकार घेत टीम इंडियाचे कंबरडे मोडले. या सामन्यात मोर्कोच्या बॅटिंग बॉलिंगशिवाय मार्करमनं कमालीच्या क्षेत्ररक्षणानं लक्षवेधून घेतलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मार्कोचा जबरदस्त बाउन्सर अन् मार्करमचा सर्वोत्तम कॅच
मार्को यान्सेन याने आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करत गुवाहाटीच्या लाल मातीच्या खेळपट्टीवर उसळत्या चेंडूसह भारतीय फलंदाजांसमोर आव्हान निर्माण केले. नितीश कुमार रेड्डीला परफेक्ट बाउन्सरवर त्याने तंबूचा रस्ताही दाखवला. मार्कोच्या खात्यात तिसरी विकेट जमा करण्यासाठी एडेन मार्करम याने कमालीच्या फिल्डिंगचा नजराणा दाखवून दिला. दुसऱ्या स्लिपमध्ये उभे असलेल्या मार्करम याने हवेत उडी मारत कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम झेल टिपला. त्याने घेतलेल्या झेलची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.
IND vs SA : गुवाहाटीत द. आफ्रिकेचं “समदं ओकेमध्ये हाय…”; भारताचे 'शेर' पहिल्या डावात सपशेल ढेर!
नितीश कुमार रेड्डी आखूड टप्प्याच्या चेंडूवर फसला अन्...
भारतीय संघाने रिषभ पंतच्या रुपात पाचवी विकेट गमावल्यावर ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी फलंदाजीला मैदानात उतरला. चहापानानंतर मार्को सातत्याने बाउन्सरचा मारा करताना पाहायला मिळाले. भारताच्या डावातील ४१ व्या षटकात नितीश कुमारच्या रुपात भारतीय संघाला त्याने आणखी एक धक्का दिला. या षटकातील चौथ्या चेंडूवर आखूड टप्प्यावरील उसळता चेंडू नितीश कुमारच्या ग्लोव्ह्जला लागून दुसऱ्या स्लिपच्या दिशेनं हवेत उडाला. मार्करमनं कमालीच्या चपळाईसह चेंडूच्या दिशेनं झेप घेत सर्वोत्तम कॅच पकडत भारतीय ऑलराउंडरचा खेळ खल्लास केला.
संघातून बाहेर झाल्यावर पुन्हा मिळाली होती संधी
कोलकाता कसोटी सामन्याआधी नितीश कुमार रेड्डीला संघातून रिलीज करण्यात आले होते. भारतीय संघ कसोटी सामन्यात व्यग्र असताना तो दक्षिण आफ्रिका 'अ' विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय 'अ' संघाकडून खेळताना दिसून आले. मानेच्या दुखापतीमुळे शुभमन गिल कसोटी मालिकेतून आउट झाल्यावर नितीश कुमार रेड्डीला पुन्हा संघात बोलावण्यात आले. पण त्याला या सामन्यात धमक दाखवता आली नाही. १८ चेंडूत १० धावा करून तो माघारी फिरल्याचे पाहायला मिळाले.