India vs South Africa 5th T20I Live Updates : पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात पावसाने दमदार बॅटींग सुरू ठेवली आहे. पावसामुळे भारत-दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लढत ५० मिनिटे उशीराने सुरू झाली आणि ३.३ षटकांचा सामना झाल्यानंतर पुन्हा पावसाने एन्ट्री घेतली. त्यामुळे अजूनही सामना सुरू झालेला नाही. बंगळुरूत अजूनही पाऊस पडतोय आणि हीच परिस्थिती राहिली तर ५-५ षटकांचा सामना खेळवण्याची तयारी अम्पायर्सनी दाखवली आहे. पण, त्यासाठी त्यांनी एक निर्धारीत वेळ ठरवली आहे. त्याआधी परिस्थिती सुधरली नाही, तर हा सामना रद्दही होऊ शकते.
भारताला साजेशी सुरुवात करता आलेली नाही. इशान किशनने ( ishan kishan) पहिल्या षटकात दोन षटकारांसह १६ धावा केल्या, परंतु दुसऱ्या षटकात लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला. ऋतुराज गायकवाड पुन्हा अपयशी ठरला आणि भारताला २७ धावांत २ धक्के बसले. पावसामुळे हा सामना आधिच १९-१९ षटकांचा करण्यात आला होता. या मालिकेत २००+धावा करणारा इशान हा पहिलाच फलंदाज ठरला. पण, लुंगी एनगिडीने दुसऱ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर भारताला धक्का दिला. एनगिडीने टाकलेला स्लोव्ह यॉर्कर खेळण्यास इशान चुकला अन् त्याचा त्रिफळा उडाला. ७ चेंडूंत १५ धावा करून तो माघारी परतला. ऋतुराजकडून आज मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु तोही चौथ्या षटकात एनगिडीच्या स्लोव्ह चेंडूवर फसला अन् १० धावांवर झेल देऊन माघारी परतला.
आता हाती आलेल्या अपडेट्सनुसार १०.०२ वाजेपर्यंत हा सामना सुरू करू शकतो अशी माहीती अम्पायर्सनी दिली आणि ५-५ षटकांचा सामना होऊ शकतो. पण, जर पाऊस असा सुरू राहीला तर तेही शक्य होणार नाही.