India vs South Africa 3rd T20I Live Updates : मागील दोन सामन्यांत फार कमाल करू न शकलेल्या ऋतुराज गायकवाडला ( Ruturaj Gaikwad) मोक्याच्या सामन्यात सूर गवसला. ०-२ असा पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला मालिकेत कायम राहण्यासाठी ही लढत जिंकणे गरजेचे असताना ऋतुराजची बॅट चांगलीच तळपली. त्याने एनरिच नॉर्खियाच्या एका षटकात मारलेले पाच चौकार लाजवाब होते. Vizag च्या स्टेडियमच्या प्रत्येक कोपऱ्यात ऋतुराजने चेंडू पाठवून चाहत्यांना खूश केले. त्याने इशान किशनसह पहिल्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली.
रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला सलग दोन ट्वेंटी-२० सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे आणि आजचा सामना जिंकून मालिका विजयाचा त्यांचा निर्धार आहे. Vizag भारताने १३ पैकी १० सामने जिंकले आहेत. नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाच्या बाजूने लागला आणि त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात बदलाची अपेक्षा होती, परंतु कर्णधार रिषभ पंतने संघात कोणताच बदल केलेला नाही. आफ्रिकेनेही तोच संघ कायम राखला आहे.
दोन सामन्यात हरवलेला ऋतुराज गायकवाड ( Ruturaj Gaikwad) आज फॉर्मात दिसला. त्याने दमदार सुरुवात करून देताना आफ्रिकेच्या गोलंदाजांवर दडपण निर्माण केले. ऋतुराजने पाचव्या षटकात एनरिच नॉर्खियाला सलग ५ चौकार खेचले. भारताने ५.३ षटकांत फलकावर ५० धावा चढवल्या. त्याने पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय सलामीवीरांनी केलेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. १०व्या षटकात केशव महाराजने ही भागीदारी तोडली. ३५ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५७ धावा करणाऱ्या ऋतुराजला त्याने अफलातून झेल घेत बाद केले.