हिमाचल प्रदेश येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात विकेट्सने पराभव करत मालिकेत २-१ अशी महत्त्वाची आघाडी घेतली आहे. युवा गोलंदाज अर्शदीप सिंहची भेदक गोलंदाजी आणि त्यानंतर स्टार फलंदाज अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने हा विजय साकारला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय गोलंदाजीसमोर फार काळ तग धरू शकला नाही आणि त्यांना केवळ ११७ धावांपर्यंत मजल मारता आली. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने सोळाव्या षटकातच विजय मिळवला. या सामन्यात तिलक वर्माच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली.
भारताकडून डावाची सुरुवात करणाऱ्या अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी ६० धावांची भक्कम भागीदारी करून विजयाचा पाया रचला. अभिषेकने अवघ्या १८ चेंडूत ३५ धावांची झंझावाती खेळी केली, ज्यात तीन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या तिलक वर्माने संयमी पण निर्णायक फलंदाजी करत नाबाद २५ धावा केल्या, ज्यात तीन चौकारांचा समावेश होता.
भारताच्या या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तिलक वर्माच्या नावावर आता एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. या सामन्यातील नाबाद २५ धावांच्या खेळीसह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ४,००० धावा पूर्ण केल्या.या कामगिरीसह तिलक वर्माने विराट कोहली आणि शुभमन गिल यांना मागे टाकले आहे. तिलक वर्माने केवळ १२५ व्या डावात हा टप्पा गाठून, टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ४,००० धावा पूर्ण करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे.
तिलक वर्माची टी-२० कारकीर्द
तिलक वर्माने २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून तो संघाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. त्याने आतापर्यंत ३९ टी-२० सामन्यांमध्ये एकूण १,११० धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळतो, जिथे त्याच्या नावावर १ हजार ४९९ धावा आहेत.