Shubman Gill Ruled Out, Team India Captain IND vs SA 2nd Test: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल याला गुवाहाटी कसोटीतून विश्रांती देण्यात आली आहे. संघ व्यवस्थापन आणि वेद्यकीय टीमशी सल्लामसलत करून डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी तो मुंबईला रवाना झाला आहे. गिलच्या अनुपस्थितीत अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा संघाचे नेतृत्व करणार आहे. तो सध्या संघाचा उपकर्णधार आहे.
गिलला विश्रांतीचा सल्ला
२२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीपूर्वी गिलने शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) संघ सोडला आणि तो मुंबईला रवाना झाला. गिल १९ तारखेला संघासोबत गुवाहाटीला पोहोचला होता, पण २० तारखेच्या सरावात त्याने सहभाग घेतला नाही. गिल पुढील दोन-तीन दिवस मुंबईत विश्रांती घेणार आहे आणि त्यानंतर तो डॉ. दिनशॉ पारडीवाला यांच्याकडे उपचार घेईल, अशी माहिती मिळाली आहे. त्याच्या फिटनेसबाबत अधिक स्पष्टता लवकरच येण्याची अपेक्षा आहे. सध्या तरी त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) जाण्याची गरज नसल्याचे सांगितले जात आहे.
पंतकडे नेतृत्वाची जबाबदारी
पहिल्या कसोटीत भारताचा मानहानिकारक पराभव झाल्यानंतर, गुवाहाटीतील हा सामना मालिका वाचवण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. गिल संघात नसल्याने, ऋषभ पंतकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच, संघ व्यवस्थापनाला अंतिम ११ खेळाडूंबाबत काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. युवा खेळाडू साई सुदर्शन आणि नितीश कुमार रेड्डी हे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. गुवाहाटीतील लाल मातीची खेळपट्टी उसळी आणि फिरकीला मदत करेल, असा अंदाज आहे. भारतीय संघ आता मालिका वाचवण्यासाठी मैदानावर उतरण्यास सज्ज झाला आहे.