Senuran Muthusamy Century : गुवाहाटीच्या मैदानातील ऐतिहासिक कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलू सेनुरन मुथुसामी याने शतकी खेळीसह अविस्मरणीय खेळी साकारली आहे. बारसापारा स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्यात त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्या शतकाला गवसणी घातली. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन त्याने संघ अडचणीत असताना दमदार खेळी केली. याआधी पाकिस्तान विरुद्ध केलेली नाबाद ८७ धावा ही त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सातव्या क्रमांकावर शतकी खेळी करणारा तिसरा
सेनुरन मुथुसामी सातव्या क्रमांकावर शतकी खेळी करणारा दक्षिण आफ्रिकेचा तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी क्विंटन डिकॉकनं २०१९ मध्ये विशाखापट्टणमच्या मैदानात भारताविरुद्ध याच क्रमांकावर फलंदाजी करताना १११ धावांची खेळी साकारली होती. १९९७ मध्ये लान्स क्लुजनरनं केपटाउन कसोटीत नाबाद १०२ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
IND vs SA : कोण आहे Senuran Muthusamy? कसोटी पदार्पणात 'विराट' विकेट; भारताशी खास कनेक्शन अन् बरंच काही
या दिग्गजांच्या पक्तींत जाऊन बसला मुथुसामी
गुवाहाटीच्या मैदानातील दमदार खेळीच्या जोरावर मुथुसामी याने दिग्गजांच्या पक्तींत स्थान मिळवले आहे. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या तिन्ही देशांविरुद्ध ५० पेक्षा अधिक धावा करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा चौथा फलंदाज ठरला आहे. याआधी ग्रेम स्मिथ, मार्क बाउचर आणि टेम्बा बावुमानं या तिघांनी या तीन संघाविरुद्ध ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्याचे पाहायला मिळाले होते. या यादीत आता मुथसामीची वर्णी लागली आहे. २०१९ मध्ये कसोटी पदार्पण करुनही तो फक्त ८ वा कसोटी सामना खेळत आहे.
आघाडीच्या फलंदाजांना रोखले, पण...
मुथुसामीची खेळी म्हणजे सिलॅबस बाहेरचा पेपर अशीच आहे. आघाडीच्या फलंदाजांना अर्धशतकाच्या आत माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाजांनी यश मिळवले. पण लोअर मिडल ऑर्डरसह तळाच्या फलंदाजीत मार्को यान्सेन याने केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या डावात ४०० धावांचा आकडा पार केला आहे. पहिल्या डावात ४०० पेक्षा अधिक धावा केल्यावर दक्षिण आफ्रिकेचा संघाने कसोटी सामना कधीच गमावलेला नाही. त्यामुळे गुवाहाटी कसोटीत टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे.